मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेसह नांदेडचा आढावा
• शासकीय रुग्णालयांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी
आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा समन्वय महत्त्वाचा
• औषधांचे दररोज ऑनलाईन पद्धतीने होईल सनियंत्रण
• विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांची भेट देऊन पाहणी
नांदेड (जिमाका), दि. 5 :- कोरोना सारख्या अत्यंत आव्हानात्मक काळात राज्यातील आरोग्य यंत्रणेने, डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य आहोरात्र बजावून राज्यातील जनतेच्या आरोग्याला सावरले आहे. शासनाने आरोग्यासाठी निधी कमी पडू दिलेला नाही. भविष्यातही कमी पडू देणार नाही. जिल्ह्यातील आरोग्याच्या सेवा-सुविधा अधिक भक्कम व्हाव्यात यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि आयुक्त कार्यालय यांच्या पातळीवर आपात्कालीन, मध्यावधी व दीर्घकालीन नियोजन करून तातडीने उपाययोजनेसाठी आवश्यक ती पूर्ती करून तत्पर राहिले पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
राज्यातील आरोग्य व्यवस्था व नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथील सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे दिल्ली येथून घेतला. या बैठकीस मुंबई येथून मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते. तर नांदेड येथून विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नांदेड आणि घाटी येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही श्री. शिंदे यांनी यावेळी दिला. औषध खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांनाही अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
प्राथमिक पाहणीत औषधाची कुठेही कमतरता आढळून आली नाही. परिचारिका यांची आवश्यक ती संख्या दिसून आली. याचबरोबर डॉक्टरांची कुठे जाणिवपूर्वक चूक होती असे दिसून आले नसल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. यात लहान मुलांचा जो मृत्यू झाला त्याच्या कारणांचा शोध घेऊन केवळ तात्पुरत्या स्वरुपात नियोजन न करता आरोग्याच्याबाबत रुग्णांची वाढलेली संख्या, उपलब्ध असलेली यंत्रणा, भविष्यात लागणाऱ्या गरजा याचा सारासार विचार करून दिर्घकालीन नियोजन प्राथमिकतेने करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतांना सांगितले.
रुग्णालयात जे नियोजन व खाटांची संख्या आहे त्या तुलनेत रुग्णांची संख्या वरचेवर वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे. नांदेड येथे 508 क्षमता असलेल्या रुग्णालयात 1 हजार रुग्ण उपचार घेतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने येथील रुग्णालयाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मनुष्यबळ कमी असल्यास आउटसोर्सिंग करण्याचे अधिकारही जिल्हास्तरावर देण्यात आलेले आहेत, त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना साधन सामग्री, मनुष्यबळाअभावी विलंब झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल आणि औषधे, मनुष्यबळाची कमतरता ही कारणे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारही मुख्यमंत्र्यांनी दिला.
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये नेमकी कुठे कोणती कोणती औषधे आहेत, त्या सर्व औषधांचा दररोज साठा तपासता यावा, कुठे कोणत्या औषधाची कमतरता असेल तर त्याचे तात्काळ नियोजन करता यावे, यादृष्टिने ऑनलाईन औषधांचे नियंत्रण करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी
रुग्णालयास भेट देऊन केली पाहणी
छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी आज डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यात प्रामुख्याने नवजात शिशुंचा वार्ड, मेडिसीन वार्ड येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. याचबरोबर रुग्णालयाच्या सद्यस्थिती बाबत त्यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांची व्यापक आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे, बालरोग विभाग प्रमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000
छायाचित्र : सदानंद वडजे, नांदेड
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.