#महिलांना_मस्जिदीमध्ये_प्रवेश_का_दिला_जात_नाही? 🪶एम आय शेख

 #महिलांना_मस्जिदीमध्ये_प्रवेश_का_दिला_जात_नाही?


                            🪶एम आय शेख


 🔺 "स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांच्या विशिष्ट जबाबदार्‍या लक्षात घेऊन “इबादत फ्रॉम होम”ची सुविधा दिलेली आहे. जशी कोविडची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना ’वर्क फ्रॉम होम’ची सुविधा दिलेली होती."      - एम आय शेख


                                   🔰🔰🔰





♦️मुुस्लिम समाज आपल्या महिलांना मस्जिदीमध्ये प्रवेश करू देत नाही, असा एक व्यापक समज आपल्या देशात रूढ आहे. एवढेच नव्हे तर अनेक मुस्लिम लोकांचाही असाच समज आहे. हा समज खरा आहे काय? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी हा लेखन प्रपंच.


▪️इस्लामच्या सुरूवातीच्या काळात महिलांना मस्जिदीमध्ये मुक्त प्रवेश दिला जात होता आणि आजही इस्लामच्या दोन सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या मस्जिदी मक्का आणि मदीनामध्ये त्यांना मुक्त प्रवेश आहे. प्रार्थनेसाठी त्यांची वेगळी व्यवस्था दोन्ही ठिकाणच्या मस्जिदीमध्ये केलेली आहे. अपवाद काबागृहाच्या तवाफ (परिक्रमा)चा. त्या ठिकाणी मात्र स्त्री-पुरूषांना एकत्रच प्रवेश दिला जातो. 


▪️भारतातही हैद्राबादच्या मक्का मस्जिपासून ते दिल्लीच्या जामा मस्जिदपर्यंत महिलांना मुक्त प्रवेश दिला जातो. केरळ राज्यातील अनेक मस्जिदींमध्ये महिलांना मुक्त प्रवेशाची सुविधा आहे. मात्र सर्वसाधारणपणे गाव-मोहल्ल्यातील मस्जिदींमध्ये महिला नमाज अदा करण्यासाठी जात नाहीत. त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे या मस्जिदी आकाराने छोट्या असतात. त्या ठिकाणी स्त्री व पुरूषांची वेगळी व्यवस्था करणे शक्य नसते. म्हणून महिला स्वतःच अशा मस्जिदींमध्ये जात नाहीत. दूसरे कारण म्हणजे स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांच्या विशिष्ट जबाबदार्‍या लक्षात घेऊन “इबादत फ्रॉम होम”ची सुविधा दिलेली आहे. जशी कोविडची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना ’वर्क फ्रॉम होम’ची सुविधा दिलेली होती. 


▪️प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कोणत्याही परिस्थितीत स्त्री-पुरूष मुक्तपणे एकत्रित जमा होणार नाहीत याचे आदेशच दिलेले नाहीत तर आयुष्यभर अशा गॅदरिंग होणार नाहीत, याची त्यांनी स्वतःही काळजी घेतली होती. नमाजमध्ये लोक गोळा होतात. शुक्रवार आणि ईदच्या विशेष प्रार्थनेला मोठ्या प्रमाणात लोक गोळा होतात. त्यात पुन्हा नमाज ही जमाअत (सांघिकरित्या) अदा केली जाते. त्यात एका ओळीत खांद्याला खांदा लावून उभे रहावे लागते. मस्जिदीचा आकार छोटा असेल तर स्वतंत्रपणे ही सर्व प्रक्रिया अमलात आणणे अशक्य होऊन जाते. म्हणून महिला साधारणपणे मस्जिदीमध्ये जात नाहीत म्हणून याचा अर्थ त्यांना मस्जिदीमध्ये प्रवेश निषिद्ध आहे, असा काढणे चुकीचे आहे. ज्या मोठ्या मस्जिदींचा वर उल्लेख करण्यात आलेला आहे. त्या आणि तशा प्रकारच्या अन्य मस्जिदींमध्ये महिलांच्या जमातीची वेगळी व्यवस्था केलेली असते. 


▪️स्त्रियांना मस्जिदीमध्ये न जाता घरी नमाज अदा करण्याची परवानगी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी खालील शब्दात दिलेली आहे. "जर त्यांना नमाजसाठी मस्जिदीमध्ये जायचे असेल तर त्यांना कोणी प्रतिबंध करू नये” मात्र प्रेषित सल्ल. यांनी लगेच पुढे म्हटले आहे की, "त्यांच्यासाठी घरी नमाज अदा करणे मस्जिदीत नमाज अदा करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.” ह. इब्ने उमर रजि. आणि अबु हुरैरा रजि. यांनी साक्ष दिलेली आहे की, प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या समक्ष म्हटले की,”अल्लाहच्या भक्तीनींना अल्लाहच्या घरात प्रवेश करण्यास मनाई करू नका.” (संदर्भ ः अबु दाऊद). एके ठिकाणी इब्ने उमर रजि. यांनी साक्ष दिलेली आहे की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांच्या समक्ष म्हटले आहे की, ”महिलांना रात्रीच्या नमाजसाठीही मस्जिदीमध्ये जाण्याची परवानगी द्या. (संदर्भ : बुखारी व मुस्लिम). ”आपल्या घरातील महिलांना मस्जिदीमध्ये जाण्यास प्रतिबंध करू नका. परंतु त्यांनी घरी नमाज अदा करणे हे त्यांच्यासाठी अधिक चांगले आहे” (संदर्भ : अहेमद अबुदाऊद).


▪️एकेठिकाणी एक सन्माननीय महिला ह.उम्मे हुमीद सादिया रजि. यांनी एकदा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे निवेदन केले होते की, ”हे प्रेषित सल्ल. मला तुमच्या पाठिमागे नमाज पढण्याची फार इच्छा आहे.” त्यावर प्रेषित सल्ल. यांनी त्यांना उत्तर दिले की, ”तुमच्याद्वारे स्वतःच्या शयन कक्षात नमाज अदा करणे तुमच्या घराच्या दिवाणखाण्यात अदा करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तुम्ही तुमच्या घरात नमाज अदा करणे, तुमच्या मोहल्ल्यातील मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे आणि तुमच्या मोहल्ल्यातील मस्जिदमध्ये तुम्ही नमाज अदा करणे जामा मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.” (संदर्भ : अहेमद/तिबरानी)


▪️याच प्रकारच्या अनेक रिवायती हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रजि. जेकी प्रेषित सल्ल. यांचे सख्खे चुलतभाऊ आणि कुरआनचे पहिले भाष्यकार आहेत यांच्याद्वारे प्रचलित आहेत. हजरत उम्मे सलमा रजि. यांनी साक्ष दिलेले आहे की, प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्या समक्ष म्हटले आहे की, ”महिलांसाठी हे अधिक चांगले की, त्यांनी मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यापेक्षा आपल्या घराच्या आतील खोलीत नमाज अदा करावी.” (अहेमद तिबरानी). 


▪️या संदर्भात अधिक कडक शब्दात आई आयेशा रजि. यांनी बनी उमैय्या कबिल्यातील महिलांचे रंग-ढंग पाहून म्हटले होते की, ”जर का प्रेषितांनी या महिलांचे रंग-ढंग पाहिले असते तर त्यांना मस्जिदीमध्ये अगदी तशीच प्रवेशबंदी केली असती जशी बनी इसराईलच्या महिलांना प्रवेश बंद करण्यात आला होता. (संदर्भ : बुखारी, मुस्लिम, अबुदाऊद).


▪️मदीना येथील मस्जिद-ए-नबवीमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्या काळात सुद्धा महिलांसाठी एका वेगळ्या प्रवेशद्वाराची व्यवस्था केलेली होती. तथापि, काही पुरूषही त्या दरवाजाने मस्जिदीमध्ये प्रवेश करत. हा प्रकार हजरत उमर रजि. यांनी आपल्या खिलाफतीच्या काळात सख्तीने बंद पाडण्यात आला होता. प्रेषित सल्ल. यांच्या काळात नमाजसाठी मस्जिदमध्ये पुरूष एका ओळीत पुढच्या बाजूला उभे राहत आणि महिला त्यांच्या मागे ओळीत उभ्या राहत. नमाज संपल्यानंतर महिला मागच्या मागे अगोदर उठून जात तर त्यानंतर पुरूष जात होते. (संदर्भ : मसनद अहेमद बुखारी).


▪️या संदर्भात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे म्हणणे असे होते की, “पुरूषांनी पुढच्या बाजूला सफबंदी (ओळीने शिस्तीत उभे राहणे)चांगले आहे आणि महिलांच्या मागे ओळीने उभे राहणे अत्यंत वाईट आहे. तसेच महिलांची सफ पुरूषांच्या मागच्या बाजूला असेल ती अतिशय चांगली आहे आणि पुरूषांच्या पुढे ओळीत उभे राहणे हे अत्यंत वाईट आहे.” (संदर्भ : मुस्लिम, अबु दाऊ, मिसाई, तिर्मिजी, मसनद अहेमद)


▪️ईदच्या दिवशीही त्या काळात महिला ईदगाहमध्ये येत होत्या. परंतु त्यांची जागा पुरूषांच्या जागेपासून अगोदरपासूनच वेगळी निश्‍चित केली जात होती. प्रेषित सल्ल. प्रथम पुरूषांना संबोधित करून ईदच्या शुभेच्छा देऊन महिलांकडे जात होते आणि त्यांना संबोधित करत होते. (संदर्भ : अबु दाऊद, बुखारी, मुस्लिम)


▪️एकदा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मदीनेच्या मस्जिदीबाहेर पाहिले असता त्यांना स्त्री-पुरूष हे एकमेकांत मिसळून चालत आहेत, असे दृश्य दिसले. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी त्या महिलांना संबोधित करत म्हटले की, ”थांबा ! तुमच्यासाठी रस्त्याच्या मधोमध चालणे उचित नाही. एका बाजूने चाला” हा आदेश ऐकताच सर्व महिला रस्त्याच्या बाजूने एकत्रित घोळका करून चालू लागल्या. (संदर्भ : अबु दाऊद). ही बाब इतकी नैसर्गिक आहे की, आजसुद्धा शाळकरी मुली आणि महिला घोळका करून रस्त्याच्या एका कडेने जात असताना सहज दिसून येतात. असे तेव्हा घडते जेव्हा त्यांना प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाची पुसटशी कल्पनासुद्धा नसते. यावरून इस्लाम ही किती नैसर्गिक व्यवस्था आहे हे लक्षात येते. 


▪️प्रेषित सल्ल. यांनी दिलेल्या वरील निर्देशांचा एकत्रित अभ्यास केला असता एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते, ती म्हणजे कामाचे ठिकाण असो का प्रार्थनेचे, स्त्री-पुरूषांनी एकत्रित मुक्तपणे वावरू नये. इस्लाम एक असा धर्म आहे जो इबादतीच्या वेळेतही स्त्री-पुरूषांना मोकळेपणे एकत्रित येऊ देत नाही. त्याच्याबद्दल अशी कल्पनाही कोण करू शकतो की तो धर्म महाविद्यालय, विद्यापीठ, कार्यालये आणि सामाजिक क्लब, उत्सवामध्ये या संदर्भात काळजी घेत नसेल. (संदर्भ : तफहिमुल कुरआन उर्दू खंड 3, पान क्र. 395-396)


▪️थोडक्यात वरील सर्व निर्देशांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला असे म्हणता येईल की, इस्लाममध्ये महिलांना मस्जिदीमध्ये प्रवेश करण्याची बंदी नाही. मात्र घरी नमाज अदा करण्याची त्यांना सवलत दिलेली आहे. या सवलतीला जर कोणी बंदी म्हणत असेल तर तो त्याच्या बुद्धीचा दोष आहे.


▪️महिलांच्या जबाबदार्‍या ह्या विशिष्ट प्रकारच्या असतात. त्यांना लहान मुलांना स्तनपान करावे लागते, त्यांचे मलमूत्र साफ करावे लागते, नमाजच्या वेळेस कोणत्या मुलाला नैसर्गिक विधी येईल हे सांगता येत नाही, कोण रडेल याचा नेम नसतो. अशा परिस्थितीत मस्जिदीमध्ये त्या गेल्या तर दुसर्‍यांसह त्यांच्या स्वतःच्या ईबादतींमध्ये सुद्धा खंड पडू शकतो.  एकंदरित या सर्व परिस्थितीचा विचार करून महिलांना मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यापासून सूट दिलेली आहे प्रतिबंध केलेला नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या