लातूर जिल्ह्यात 11 लाख 27 हजार लोकांना मिळणार आयुष्मान कार्ड,
आतापर्यंत फक्त 28 टक्के लोकांनीच काढून घेतले कार्ड
येत्या काळात आरोग्य सुविधासाठी ए.टी.एम.सारखे वापरता येणार आयुष्मान कार्ड- डॉ. ओमप्रकाश शेटे
· जिल्ह्यात आयुष्मान कार्डसाठी होणार स्पेशल ड्राईव्ह
लातूर दि. 1 (जिमाका) : जिल्ह्यातील 11 लाख 27 लाख एवढ्या पात्रताधारक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मिळणार असून आतापर्यंत फक्त 28 टक्के लोकांनी हे कार्ड काढून घेतले असून या कार्डधारकांना विविध 30 प्रकारच्या रोगांवर आयुष्मान भारत मिशन अंतर्गत उपचार होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने मिशन मोडवर जनतेची आयुष्मान कार्ड काढून घ्यावीत. येत्या काही महिन्यात आयुष्मान भारत मिशन मध्ये मोठे बदल अपेक्षित असून आयुष्मान कार्डचे महत्व ए.टी.एम. कार्डसारखे वाढेल, असे प्रतिपादन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.
लातूर जिल्ह्यातील आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत डॉ. शेटे बोलत होते. आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांच्यासह खाजगी हॉस्पिटलचे डॉक्टर, विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
आयुष्मान भारत योजनेत लातूर जिल्ह्यात मिशन मोडवर काम व्हावे, म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून त्याला गती देण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत विभागात आयुष्मान भारत कार्ड काढून घेण्यासाठी नगरपालिका प्रशासन विभागाचे सहआयुक्त रामदास कोकरे हे नोडल अधिकारी असणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत सद्यस्थितीत जिल्ह्यातील 14 हॉस्पिटल असून ती संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सुमारे 30 विविध आजार आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट असून त्याच्या पॅकेजसह यात अनेक बदल होणार आहेत. नागरिकांना मिळालेले आयुष्मान कार्ड हे भविष्यात अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असून बँकेचे एटीएम कार्ड जसे तुमच्या आर्थिक व्यवहारासाठी महत्वाचे ठरते तसेच हे तुमच्या आरोग्यासाठी हे कार्ड महत्वाचे ठरणार असल्याची माहिती डॉ. शेटे यांनी यावेळी दिली.
या योजनेत हॉस्पिटल समाविष्ट असतील त्यांची यादी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात लावली जाणार असून ग्रामसभेतही हे हॉस्पिटल आणि कोणकोणते रोग, व्याधीचा उपचार यात होतो हे वाचून दाखविण्याचेही या बैठकीत ठरले. जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेचा आढावा घेण्यात आला, यानंतर दोन महिन्यांनी या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहितीही डॉ. शेटे यांनी यावेळी दिली.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.