युवकांनी व्यवसायात पुढे यावे व्यवसाय मेळावा ः कर्नाटका रिफाहचे अध्यक्ष मुमताज मन्सुरी यांचे आवाहन

युवकांनी व्यवसायात पुढे यावे 
व्यवसाय मेळावा ः कर्नाटका रिफाहचे अध्यक्ष मुमताज मन्सुरी यांचे आवाहन

लातूर ः युवकांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे, त्यांच्यासाठी रिफाह चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही संस्था आपल्याला सर्वोतोपरी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी तयार आहे. युवकांनी स्वतःसाठी प्रथमतः नैतिकतेचे विचार अंगी बाळगावे, व्यवसायासाठी एक क्षेत्र निवडावे, त्याचा अभ्यास करावा आणि मेहनत करण्याची जिद्द अंगी बाळगून व्यवसाय करण्यासाठी मैदानात उतरावे. आपण पहाल कमी आर्थिक भांडवलातही व्यवसाय वृद्धी होईल, असे विचार रिफाहचे कर्नाटक अध्यक्ष मुमताज मन्सुरी यांनी केले. 
 रिफाह चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे बिझनेस एक्स्पो-2024 चे आयोजन रविवारी शहरातील कायमखानी फंक्शन हॉल येथे केले होते. मंचावर रिफाहचे राज्याध्यक्ष डॉ. मुहम्मद असलम, सीटको इंजिनिअर्सचे सय्यद युसूफ कासीमसाब, केंद्रीय संचालक तौफिक असलम खान, डिआयसीचे महाव्यवस्थापक प्रविण खडके उपस्थित होते. यावेळी मुमताज मन्सुरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ग्राहकांची गरज लक्षात घ्या, पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणे सोडावा, आधुनिक पद्धती अवलंबवावी, व्यवसाय वृद्धीसाठी रिफाह आपणांस मार्गदर्शन करण्यास तयार आहे, एका शाखेवरच अवलंबून राहू नका. एक दुकान स्वतःसाठी, एक समाजासाठी आणि एक देशासाठी सुरू करा, असे आवाहन मुमताज मन्सुरी यांनी केले. प्रारंभी रिफाहचे केंद्रीय संचालक तौफिक असलम खान यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी रिफाहच्या स्थापनेचा उद्देश सांगत कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांचे व्यवसायाबद्दलचे विचार सांगितले. यावेळी 32 व्यावसायकांनी आपले स्टॉल उभारले होते. यामध्ये काही स्टॉल परराज्यातूनही आले होते. दिवसभर पाऊस सुरू असतानाही शेकडो ग्राहकांनी एक्स्पोला भेट दिली. खदीर खान यांनी लातूर रिफाहतर्फे केल्या जात असलेला अहवाल सादर केला आणि व्यावसायकांनी रिफाहशी संलग्नीत होण्याचे आवाहन केले. सुत्रसंचालन जमशीद शेख यांनी केले. आभार सय्यद मुकर्रम अली यांनी व्यक्त केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रिफाहचे शहराध्यक्ष सोहेल काझी, काशीफ काझी, खिजर खान, कमरोद्दीन बार्शीकर, मुजाहिद पटेल, अमीर हमजा शेख, मुहम्मद युनूस पटेल, इंजि. सलाउद्दीन काझी यांनी परिश्रम घेतले.               


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या