राक्षसी वृत्ती......आपला देश सध्या कुठल्या दिशेने जातोय खरं म्हणजे याचा प्रत्येकानी थोडा गांभीर्याने विचार केला तरच येणारी पिढी गुणी गोविंदाने आणि एकोपा जपत जगेल....प्रत्येक वाईट गोष्टीचा वृत्तीचा हिशोब येथे नाही तरी वर गेल्यावर तरी द्यावाच लागतो.

राक्षसी वृत्ती......


आपला देश सध्या कुठल्या दिशेने जातोय खरं म्हणजे याचा प्रत्येकानी थोडा गांभीर्याने विचार केला तरच येणारी पिढी गुणी गोविंदाने आणि एकोपा जपत जगेल......
धर्माच्या नावावर जातीच्या नावावर किती दिवस एकमेकाशी कारण नसताना भांडत राहणार आहात......
होय मी हिंदू आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे परंतु मी इतर जाती-धर्माचा अवमान करत नाही कारण ते माझे संस्कार नाहीत, माझा धर्म मला ते शिकवत नाही...‌.‌
माझा जन्म औशातला, भुई गल्ली जिथे संपते आणि खडकपुरा मोहल्ला जिथे सुरू होतो अशा ठिकाणी माझ्या वडिलांचे घर !
लहानपणापासून जात हा प्रकार आम्हाला माहीत नाही. तो या जातीचा तो या धर्माचा आसा विचार कधी डोक्यात ही आला नाही. तसे संस्कार माझ्या वडिलांनी दिले नाहीत..‌.‌.
आणि म्हणूनच ज्याप्रकारे आज देशात, समाजात जाती धर्मामध्ये दिवसेंदिवस तेढ निर्माण होताना पाहून खरंच मनाला खूप वेदना होतात. काय वाढून ठेवतोय आपण येणाऱ्या पिढीसमोर !
आपला भाईचारा फक्त हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा आणि मुस्लिम बांधवांना ईदगा मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या गर्दीपर्यंतच मर्यादित राहिला आहे का ?हा खरा प्रश्न आहे.असो
माझे हे विचार कुणाला पटतील आणि कदाचित कुणाला पटणार ही नाहीत, परंतु मी माझे विचार मांडायला स्वातंत्र आहे....
एखाद्या हिंदू मुलीवर, महिलेवर बलात्कार झाला तर त्याचा निषेध फक्त हिंदूंनीच करावा असे नाही त्याचप्रमाणे एखादा अत्याचार मुस्लिम महिलेवर झाला तर त्याचा निषेध फक्त मुस्लिम बांधवांनीच करावा असेही नाही. सगळ्यात अगोदर ती एक स्त्री आहे. कुणाची तर मुलगी आहे कुणाची बहीण आहे.....
लहानपणी मी पाहीले आहे,औसा शहरात कधी जातीवाद झाला नाही कुणी केला ही नाही. मोहरम, संदल मध्ये हिंदू बांधव सहभागी होताना आणि गणपती विसर्जन मध्ये मुस्लिम बांधव सहभागी होताना पहात आम्ही लहानाचे मोठे झालो.....
आजही दिवाळीचा फराळ मुस्लिम बांधवाला दिल्याशिवाय आम्हाला गोड लागत नाही आणि ईदला शीरखुरमा हिंदू बांधवांना गळाभेट घेऊन दिल्याशिवाय मुस्लिम बांधवांना ईद पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही.
असे वातावरण असून सुद्धा मग आपण कुठे चुकतो आणि कोण आहेत ते राक्षस जे धर्माधर्मात जाती जातीत तेढ निर्माण करतात.
माझ्या वडिलांचे दोन्ही शेजारी मुस्लिम आहेत.कै. दस्तगीर मामा आणि जलील मामा शेख या परिवाराशी असलेले आमचे पारिवारिक संबंध आजही जसेच्या तसे आहेत.कै. रशीद मामा कुरेशी हे नाव आमच्या दहा पिढ्या विसरणार नाही. आजही कुरेशी परिवार आम्हाला आमच्या कुटुंबातीलच एक भाग आहे असे वाटते.
आज ही डॉक्टर अरब यांना राखी बांधल्या शिवाय माझी आई तिच्या सख्ख्या भावांना राखी बांधत नाही.
स्वतःला हिंदूंचे कैवारी आणि मुस्लिमांचे मसीहा समजणाऱ्या त्या त्या धर्मातील राक्षसी वृत्तीच्या लोकांपासून प्रत्येकाने दूर राहिले पाहिजे नाहीतर येणारी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. प्रत्येक वाईट गोष्टीचा वृत्तीचा हिशोब येथे नाही तरी वर गेल्यावर तरी द्यावाच लागतो.
जयश्रीताई उटगे 
औसा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या