विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
१९ व २० नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या
राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण बंधनकारक
· जिल्हास्तरीय समितीकडे तीन दिवस अगोदर अर्ज सादर करणे आवश्यक
लातूर, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने राजकीय प्रचार जाहिरातींबाबत नियमावली ठरवून दिली आहे. यानुसार वृत्तपत्रात मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानादिवशी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.
निवडणूक काळात दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती, बल्क एसएमएस, व्हाईस मेसेजेस, सोशल मीडिया इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या जाहिरातींचे पूर्व-प्रमाणीकरण करणेही आवश्यक आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्यासाठी लातूर जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती (एमसीएमसी) कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. समिती कक्ष बार्शी रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर कक्ष क्र. २१० येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. उमेदवार किंवा प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज समितीकडे सादर करावा. विहित नमुना एमसीएमसी कक्षात उपलब्ध आहे. एमसीएमसी समितीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर 48 तासांत अर्ज निकाली काढण्यात येतील.
जाहिरात नियमानुसार नसल्यास प्रमाणीकरण नाकारण्याचा किंवा बदल सुचविण्याचा अधिकार एमसीएमसी समितीला आहे. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन जाहिरात सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणिकराणासाठीचा अर्ज विहित नमुन्यात सादर करावा. त्यात जाहिरात निर्मिती खर्च, जाहिरात प्रसारण खर्च व कालावधी, उमेदवार किंवा पक्षाचे नाव, स्वतंत्र व्यक्ती असल्यास प्रतिज्ञापत्र आदी महत्वाच्या बाबींच्या नोंदीसह दोन प्रतीत साक्षांकित केलेली जाहिरात संहिता (स्क्रिप्ट) व दृक-श्राव्य चित्रीकरण सीडी किंवा पेनड्राइव्हमध्ये समितीकडे देण्यात यावे. उमेदवार व राजकीय पक्षाच्या ब्लॉग, संकेतस्थळावरील, वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केलेला राजकीय स्वरुपाचा संदेश, मजकूर, छायाचित्र, व्हीडीओ मजकूर राजकीय जाहिरात समजली जाणार नाही, त्यामुळे त्यासाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक नाही. तथापि, जाहिरातीचे प्रमाणीकरण आवश्यक आहे.
*****
Collector & District Magistrate, Latur
Chief Electoral Officer Maharashtra
Latur Police Department
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.