विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानानिमित्त
२० नोव्हेंबर रोजी कामगारांना मिळणार एका दिवशीची सुट्टी
लातूर, दि. १३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत राज्य शासनाने ७ नोव्हेंबर २०२४ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. कामगारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, यासाठी मतदान होत असलेल्या क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने जसे, खासगी कंपन्यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स यांना ही सुट्टी लागू राहणार आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्रापत न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याची तक्रार मतदारांकडून प्राप्त झाल्यास संबंधिताविरुद्ध विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे राज्य शासनाने निर्गमित केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० ऑक्टोबर रोजी अधिसूचना निर्गमित करून २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजिक सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
Collector & District Magistrate, Latur
Latur Police Department
Chief Electoral Officer Maharashtra
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.