शिवसैनिक निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार.. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
लातूर दि.२८ (प्रतिनिधी) आता होणाऱ्या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुकीमध्ये शिवसैनिक निवडून आला पाहिजे, याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना नेत्यांवर सोपवली आहे. ८० टक्के समाजकारण हीच शिवसेनेची ओळख असल्याने त्या अनुसरून सर्वांनी काम करावे, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लातूरला केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर लातूर जिल्हा शिवसेनेच्या आढावा बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, महिला जिल्हा संघटक सौ.जयश्री उटगे,सौ. सुनीताताई चाळक, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, डॉ. शोभा बेंजरगे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, राहुल मातोळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, यापूर्वी माझ्याकडे लातूरची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. त्यावेळी आठ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले होते. भाजपचा एकही नगरसेवक नव्हता. आता पुन्हा त्याच जोमाने सर्वांनी काम करायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका गांभीर्याने घेतलेल्या आहेत. शिवसैनिक निवडून आला पाहिजे, यासाठी शिवसेनेच्या सर्व नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे लातूर जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. मी पक्षप्रमुखांनी दिलेले काम करत आहे. स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंदर्भातील सर्व निर्णय हे पक्षप्रमुख घेतील. ज्या ठिकाणी आघाडी करावी लागेल त्या ठिकाणी आघाडी होईल. पैशाच्या जोरावर शिवसेना फोडण्यात आली; परंतु आजही लोकांचा विश्वास उद्धव ठाकरे यांच्यावरच असल्याचे ते म्हणाले.
सर्व निवडणुका ताकदीने लढायच्या असून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर पंचायत निवडणुकीत शिवसैनिक विजयी झाला पाहिजे, यासाठी काम करायचे आहे. असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.