सण, उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करावे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 सण, उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करावे

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे





लातूर, दि. 02 (प्रतिनिधी) : आपला लातूर जिल्हा हा शांतताप्रिय आहे. आजपर्यंत सर्वधर्मीय सण, जयंती उत्सव शांततेत साजरे करण्याची जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. ही परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सण, उत्सव साजरे करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.


अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, पोलीस उपाधीक्षक गजानन भातलवंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशीषकुमार अय्यर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, नगरपालिका प्रशासनचे सहआयुक्त मंगेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यासह निमंत्रित सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.


बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. महानगरपालिका व नगरपालिका यांनी परवानगी दिलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्याशिवाय इतर कुठेही जनावरांची कत्तल करू नये. तसेच गोवंश हत्या बंदीचे काटेकोरपणे पालन केले जावे. प्रत्येक कत्तलखाण्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कत्तलखान्यांची यादी सर्वत्र प्रसिद्ध करावी, असे त्यांनी सांगितले.


जनावरांची वाहतूक करताना नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि परिवहन विभागाने समन्वयाने काम करावे, असे अपर जिल्हाधिकारी श्रीमती करमरकर म्हणाल्या.


प्रारंभी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शिंदे यांनी महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्यातील विविध तरतुदींची माहिती दिली. तसेच बकरी ईदच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीबाबत माहिती दिली.


*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या