कळमनुरीत पाच दिवस संचारबंदी
हिंगोली,दि.29: राज्य शासनाने करोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 जून , 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविड-19 नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 2 जून, 2020 रोजीच्या आदेशान्वये जीवनाश्वयक वस्तुंची तसेच इतर दुकाने दैनंदिन सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत चालू करण्यात आली होती. परंतू कळमनुरी शहरातील काजी मोहल्ला भागात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण सात रुग्ण आढळून आल्याने कळमनुरी नगर परिषद भाग पूर्णत: बंद करणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कळमनुरी नगर परिषद मधील हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती, वाहन) व सर्व आस्थापनास दि. 29 जून ते 3 जुलै, 2020 या कालावधीत बंदी करण्यात येत आहे. त्यानुसार कळमनुरी शहराच्या सर्व सीमा या कालावधीत बंद करण्यात येत असून सदर सीमेमधून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाण्यास प्रतिबंधीत करण्यात आले आहे.
संचारबंदी काळात परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारमध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याचे विरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी नगर परिषद, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांची असेल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.