लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात गुणवत्तेबाबत तडजोड होता कामा -पालकमंत्री अमित देशमुख






लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात

गुणवत्तेबाबत तडजोड होता कामा नये
-पालकमंत्री अमित देशमुख

 

या राष्ट्रीय महामार्गाचे काम मे 2021 पर्यंत पूर्ण होणार

लातूर, दि.29(जिमाका):- लातूर बाभळगाव, निटुर, निलंगा, औराद ते कर्नाटक मधील जहिराबाद पर्यंतच्या महाराष्ट्राच्या हद्दीतील  राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. या कामाच्या दर्जा व गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड चालणार नाही, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संस्कृती कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

        येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय महामार्ग कामाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता विक्रम जाधव, उप अभियंता सुधाकर बाविस्कर, कॉन्ट्रॅक्टर सत्यजित निवनबळकर, प्रोजेक्ट मॅनेजर रमेश गाढवे, कन्सल्टंट के.के. सिंग आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाची कामे शासनाने ठरवून दिलेल्या नॉर्मस् प्रमाणे पूर्ण झाली पाहिजेत. त्या कामाची गुणवत्ता उत्कृष्ट असली पाहिजे. या महामार्गाच्या कामात कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले.

     या महामार्गांच्या कामाची बाभळगाव येथे पाहणी केली असता या कामाचा दर्जा व गुणवत्ता केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिसून येत नसल्याचे पालकमंत्री यांनी सांगून ज्या कंपनीला या कामाचे टेंडर मिळाले आहे त्या कंपनीनेच हे काम शंभर टक्के पूर्ण केले पाहिजे. टेंडर मिळालेली कंपनी हे महामार्गाचे काम इतर  कंपनीला देऊ शकत नसल्याचे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी व या कामाचे टेंडर मिळालेला कंपनीने  दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करून हा महामार्ग  विहित मुदतीत लोकांच्या वापरण्यासाठी सुरू करता येईल यासाठी अधिक गतीने काम करावे असेही त्यांनी निर्देशित केले.

   लातूर शहरातील स्वामी विवेकानंद चौक, बाभळगाव, निटुर, निलंगा व कर्नाटक राज्यातील जहीराबाद पर्यंत 64.93 किलो मीटर च्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून औराद ते निटूर पर्यंत तीस किलोमीटरचे काम पूर्ण झालेले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री जाधव यांनी देऊन मे 2021 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होऊन वापरण्यासाठी सुरू होईल असे त्यांनी सांगितले. या महामार्गाच्या कामाचा दर्जा व गुणवत्ता मध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असे गुत्तेदर निवनबलकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या