शाहिद आझमी आठवतात? नाव ऐकलंय कधी? वकील होते ते? मुंबईत मारलं त्यांना? आठवतं? नसेलच? जाऊ द्यात, कशाला करता नसती उपद्व्याप! आपण इथेच बरे आहोत. ब्रेक टी, बेड टी घेत चायवाल्याच्या जुलमावर खमंग चर्चा करत.
शाहिद वेडा होता. घरदार सोडून त्याने शेजारचं दुखणं हेरलं. त्यासाठी लढायला लागला. कोण कुठला औरंगाबादेतला कुणी तरी त्याच्यासाठी वकिली करायला गेला? सतत वेड्यासारखं ओरडत राहिला. मुस्लिम तरुणांना दहशतवादाच्या गुन्ह्यात चुकीच्या पध्दतीने गोवलं जातंय वगैरे... वगैरे...
26/11 मध्ये एका मुस्लिम तरुणाला अडकवलं. असं त्याचं म्हणणं. त्याला सोडवण्यसाठी झपाटून लढला. अगदी फुकटात. टाडा कसा चुकीचा आहे, म्हणून भांडत राहिला. अशा प्रकारच्या कितीतरी केसेस घेतल्या. सातत्याने येणाऱ्या धमक्यांना कंटाळून पत्नीने फारकत घ्यायचा प्रयत्न केला, तरी हा हट्टाने पेटलेला. काय तर मुस्लिम तरुणांना न्याय मिळवून देणार. झालं काय या हट्टाचं. तर शेवटी 2010 साली त्याला कुर्ल्याच्या टॅक्सीमेन कॉलनीत गोळ्या घालण्यात आल्या.
आता काही सुधारणावादी त्याला शहिद वगैरे म्हणतात. त्याला मारणारे पुजारी टोळीचे गुंड तो दहशतवाद्यांचे केस घेत होता म्हणून मारलं असं सांगत सुटलेत. पण हे खरं आहे का? असो. मारेकऱ्यांना सो कॉल्ड सुधारणावादी व राष्ट्रभक्ताकडूनही देशभक्तीची प्रमाणपत्रही मिळताहेत. कारण काय दहशतवाद्यांचा पाठीराखा संपवला यांनी. देशाचा शत्रूच साक्षात. संपवला तरी कसा. ड्रग्जच्या नशेत.
जाऊद्या धुंद लागतेच ना कुठली तरी अस्स काहीतरी करायला. अडाणचोट देशभक्ती वगैरे. मागे शाहिद वर चित्रपट निघाला. तुम्ही पाहू नका. तुमचं डोकं बिघडेल. त्यात नाही सारं काही. आहे सर्वकाही सोयीचं. तुमच्यासारखंच पांढरपेशी. त्याची अत्यंयात्रा नाही दाखवली. त्याला शहिद म्हणणारी त्याची आई नाही दाखवली. खालिद आझमी शाहीदचा भाऊ नाही दाखवला त्यात. तोसुद्धा वकीलच. शाहिदच्या काही केसेस लढणारा हा त्याचा भाऊसुध्दा वेडाच. आपण कशाला आठवायचे. आपल्या पोरांना यांचे किस्से कशाला सांगायचे. आपण गाऊ गुलामीच्या कथा.
आता अलीकडे कोण त्याची एक मैत्रिण राणा अय्यूब. #गुजरात_फाईल्स नावाचं पुस्तक लिहलं. पुस्तकाची सुरुवातच शाहिद आझमीच्या खुनापासून. कायतर म्हणे शाहिद आझमींचे उर्वरीत काम करत आहे. काय गरज होती. करायची कुणी सांगितलंय का? वयाच्या पंचवीशीत मुख्यमंत्र्यांचे स्टिंग करायला. का तर म्हणे. गुजरातेत झालेली दंगल मानवतेचा बळी घेणारी होती. बये तुला काय करायचे. गुजरातेत झालं ना? रहा ना शांत. जग खुशाल ब्रेक टी बेड टी घेत.. का आठवते शाहिद आझमीला.? त्याचा समाज विसरतोय त्याला तुला काय पडले त्याचे. जाऊदे सोड.
तुझ्या पुस्तकाचे कानडी भाषांतर करुन बिचाऱ्या गौरी लंकेशला जीव गमवावा लागला. आता कुणी प्रकाश राज तीच्यासाठी भांडतोय. स्वतःचे फिल्मी करिअर उद्ध्वस्त करुन. त्याला कुणी सांगितले असे उपद्व्याप करायला? त्याला का जीव गमवायची हौस.?
आणि राणा आता तू शांत रहा. पुन्हा काही पुस्तक बिस्तक लिहू नको. नाहीतरी आणखी कुणीतरी गौरी लंकेश भाषांतर करेल. आणि फुकटात जीव गमवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुलाही काहीतरी होईल. आधीच तू आजारी. पोलिओतून बाहेर पडलेली. मानसिक तणावात औषधं खात जगणारी. बघ विचार कर. थोडसं.
सरफराज अहमद
21/07/20
सोलापूर
Repost
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.