कोरोना संदर्भातील उपाययोजनांबाबत पालकमंत्र्यांकडे गांभीर्याचा अभाव
- भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे
लातूर /प्रतिनिधी :लातूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच असून आता या आजाराने मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.परंतु कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडत असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असणाऱ्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे याबाबत गांभीर्याचा अभाव असल्याचा आरोप भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केला आहे.
मगे यांनी म्हटले आहे की, मागच्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.परंतु तेथे योग्य पद्धतीचे उपचार मिळत नाहीत.शासकीय रुग्णालयात अनेक गैरसोयी आहेत.अपुरे साहित्य आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शासकीय रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध नाही. एकीकडे या रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असे म्हटले जाते परंतु तेथे सुविधांचा अभाव आहे. या रुग्णालयातून अनेक रुग्णांना सोलापूर येथे रेफर करण्यात आले आहे.शासकीय रुग्णालयाची अशी अवस्था असल्याने नाईलाजाने रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार करणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. त्यामुळे रुग्णांची घालमेल होत आहे .
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत.त्यामुळे शासकीय रुग्णालयातील सुविधांबाबत त्यांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे.शासकीय रुग्णालयातील असुविधामुळेच लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पालकमंत्र्यांनी या बाबींकडे लक्ष द्यावे.कोरोना संबंधातील उपाययोजनावर अंकुश ठेवावा.कोरोनाबाधित रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना योग्य माहिती मिळावी यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन कक्ष उभारण्यात यावा आदी मागण्याही शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केल्या आहेत.
पालकमंत्र्यांकडे गांभीर्याचा अभाव असल्यामुळे असल्याने कोरोना वाढत असून त्याला थोपवण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. पालकमंत्र्यांनी वेळीच लक्ष घातले तर कोरोना आटोक्यात येऊ शकतो,असेही मगे यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.