दिवंगत पत्रकार गंगाधर सोमवंशी यांच्या कुटुंबियांना राज्य पत्रकार संघाच्या वतीने आर्थिक मदत
सोमवंशी कुटुंबीयांना शासनाकडून 50 लाखाचा विमा कवच मिळवून देणार- वैभव स्वामी
लातूर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीमुळे कोरोना कक्षात उपचार सुरू असताना पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय संघटक वैभव स्वामी यांनी दिवंगत पत्रकार सोमवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन पत्रकार संघाच्या वतीने पंधरा हजार रुपयांचा धनादेश देऊन मानसिक आधार दिला. तर करोना काळात मृत्यू पावल्यानंतर सरकारने घोषणा केल्याप्रमाणे त्यांच्या कुटुबियांना पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असुन याबाबतचा पाठपुरावा सुरू असल्याचेही स्वामी यांनी सांगितले. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे आणि सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या पुढाकारातून राज्यात अडचणीच्या काळात पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची भूमिका सातत्याने घेतली जात असल्याचे ते म्हणाले.
लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांना करोना पॉझिटिव्ह म्हणुन जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड कक्षात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्यामुळे पत्नी, दोन मुले या कुटुंबावर मोठा आघात झाला. दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबियांची रविवार दि. 30 ऑगस्ट रोजी भेट घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय संघटक वैभव स्वामी यांनी सांत्वन केले. राज्य पत्रकार संघाच्या वतीने पंधरा हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देऊन कुटुंबियांना मानसिक आधार दिला. यावेळी लातूर महानगरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,नायब तहसीलदार राजेश जाधव,लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे,जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ बनसोडे ,जिल्हा सचिव अशोक हनवते,जिल्हा संघटक महादेव डोंबे ,जिल्हा उपाध्यक्ष लिंबराज पन्हाळकर,सुधाकर फुले,जिल्हा कोषाध्यक्ष अरुण कांबळे,शहर जिल्हाध्यक्ष बालाजी फड, शहाजी पवार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
दिवंगत पत्रकार गंगाधर सोमवंशी हे धडाडीचे आणि निर्भिड पत्रकार म्हणुन जिल्हाभर ओळखले जात होते. राज्य पत्रकार संघाचे संस्थापक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,सरचिटणीस विश्वास आरोटे, मराठवाडा विभागीय संघटक वैभव स्वामी यांच्या पुढाकारातून मयत गंगाधर सोमवंशी यांच्या कुटुंबियांना मदत दिली आहे. करोना काळात कर्तव्यावर असताना पत्रकाराचा मृत्यू झाला तर पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत विमा कवच देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्या अनुषंगाने मयत पत्रकार गंगाधर सोमवंशी यांच्या कुटुंबियांना मदत करावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा चालू असुन पालकमंत्री अमित देशमुख यांचे पत्र घेऊन पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.