जिल्हयातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून
वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी-महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार....
*आर्थिक अडचण असली तरी शासन शेतकऱ्यास कर्ज काढून मदत देणार....
>>> अतिवृष्टी झालेल्या औसा व निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी...
एस ए काझी
औसा प्रतिनिधी /- जिल्हयात काही मंडळामध्ये अतिवृष्टी तर काही मंडळात संततधार पाऊसामुळे सोयाबीन व इतर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची संबंधित अधिकारी वर्गाने दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे,खार जमिनी विकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित अतिवृष्टी पिक नुकसान व कोरोना संसर्ग आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकीस जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त देवीदास टेकाळे, अधिष्ठाता डॉ.मोहन डोईबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी व नामदेव चाळक उपस्थित होते.
या बैठकीस मार्गदर्शन करताना राज्यमंत्री अब्दूल सत्तार म्हणाले की, जिल्हयात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे सोयाबीन व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकनुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.राज्यातील महाआघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मदत करणारच आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करुन अहवाल शासनास पाठवावा. शासनाकडे आर्थिक अडचण असली तरी शेतकऱ्यांसाठी राज्यशासन कर्ज काढून मदत करेल.असे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी स्पष्ट केले.
भविष्यात कोरोना संसर्ग होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.व जिल्हयात कोरोना संसर्गावर प्रशासनाने केलेल्या कार्याबद्दल जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हयात अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काही सार्वजनिक बांधकाम विभाग व काही रस्ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत येतात. या नुकसान झालेल्या सर्व रस्त्याच्या दुरुस्तीचे कामे संबंधित विभागाने तात्काळ सुरु करावीत. अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
याबैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे,प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.या बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने, व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले. तहसिलदार महेश सावंत यांनी आभार मानले.
राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांच्याकडून अतिवृष्टी झालेल्या औसा तालुक्यातील लांमजना ,किल्लारी व निलंगा तालुक्यातील मदनसुरी व लिंबाळा या गावातील प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जावून सोयाबीन ,तूर, ऊस पिकाचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, शेतकरी बांधवाशी संवाद साधला व त्यांची निवेदने स्विकारून अस्तेवाईकपणे चौकशी केली. या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. राज्यातील महाआघाडी शासन येणाऱ्या काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांस निश्चितच मदत करणार असल्याचे शेतकऱ्यास अभिवचन दिले.
या अतिवृष्टी पिकनुकसान पाहणी कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी व नामदेव चाळक, तालुका शिवसेना प्रमुख सतिश शिंदे व रमेश पाटील, औसा- रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, औसा तहसिलदार शोभा पुजारी, निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार गोरख जाधव, जिल्हा कृषि अधिक्षक दतात्रय गावसाने, प्रशासनातील अधिकारी ,मंडळ अधिकारी, तलाठी,कृषि सहाय्यक, शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.