लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळास पॅकेज द्यावे
- मानवहीत लोकशाही पक्षाचे अध्यक्ष सचिन साठे यांची मागणी
- मानवहीत लोकशाही पक्षाचे अध्यक्ष सचिन साठे यांची मागणी
लातूर/ प्रतिनिधी: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळास विद्यमान सरकार व मागील सरकारनेही निधी दिलेला नाही.हे महामंडळ बंद पडण्याच्या मार्गावर असून ते पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने पॅकेज घोषित करावे,अशी मागणी मानवहीत लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
सचिन साठे यांनी समाजाचे विविध प्रश्न आणि महामंडळाच्या समस्यांच्या अनुषंगाने मराठवाडा दौरा सुरू केला आहे. त्यानिमित्त लातूर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.सचिन साठे यांनी सांगितले की, देश स्वतंत्र झाल्यापासून मातंग समाज अन्याय सहन करत आहे. राज्यातील विद्यमान सरकार आणि मागच्या सरकारनेही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळास निधी दिलेला नाही. कोरोनामुळे समाजबांधव अतिशय संकटात सापडलेले आहेत. त्यातून बाहेर पडल्यानंतर समाजाला आता मदतीची गरज आहे.मातंग बांधवांना इतर कुठल्याही माध्यमातून मदतीचा हात मिळत नाही.अशा काळात महामंडळ हे एकमेव आशास्थान आहे.सरकारने निधी न दिल्यामुळे हे महामंडळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे.महामंडळ बंद पडून अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची बदनामी होऊ नये यासाठी आपण हा दौरा आयोजित केला आहे.
ते म्हणाले की,महामंडळ वाचवण्यासाठी महामंडळ बचाव कृती समितीची स्थापना केली आहे.या प्रश्नासंदर्भात सामाजिक न्याय मंत्र्यांसोबत आपली चर्चा झालेली असून लवकरच निधी प्राप्त होईल अशी आशा आहे. परंतु कोरोनामुळे निधी देण्यावरही निर्बंध आहेत. अशा स्थितीत महामंडळाला पॅकेज जाहीर केले नाही तर आंदोलन उभे करू, असा इशारा त्यांनी दिला.
सचिन साठे म्हणाले की, समाजावर आजही अन्याय अत्याचार होत आहेत. समाजबांधवांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. महिला व तरुणींची छेड काढली जात आहे.अशा वेळी सरकार आणि नेतृत्वाने निश्चित भूमिका घेण्याची गरज आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यासाठी तत्कालीन सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. परंतु त्यातील १०० रुपये देखील खर्च झाल्याचे दिसले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना आपला पाठिंबा आहे. समाजातील पदवीधरांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले असून सतत लोकसंपर्कात राहणारे ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे पदवीधरांनी सतीश चव्हाण यांच्या पाठीशी रहावे,असे आवाहनही त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेस कोअर कमिटीचे अध्यक्ष टी.एन.कांबळे, जिल्हाध्यक्ष रवी अर्जूने, सुरेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.