जिल्ह्यात सातवी आर्थिक गणनेचे काम असमाधानकारक
असल्याने पुनर्गणना करण्यात यावी
-जिल्हाधिकारी पृथ्वीराज पी. बी.
लातूर ,दि.30(जिमाका):- जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेचे काम 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेने जे काम करून आर्थिक गणनेची नागरी व ग्रामीण भागातील आकडेवारी प्रशासनासमोर सादर केलेली आहे, ती आकडेवारी असमाधानकारक असल्याने संबंधित यंत्रणेने पुन्हा आर्थिक गणना करावी व त्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी याबाबत जिल्हा सांख्यिकी विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सातवी आर्थिक गणनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पी. बी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सातवी आर्थिक गणना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, सांख्यिकी विभागाचे संशोधन सहाय्यक श्री बोदडे, श्री प्रभनकार, पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे, आर्थिक गणना करणाऱ्या खाजगी यंत्रणेचे जिल्हा समन्वयक रवींद्र भडंगे यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले की, सातवी आर्थिक गणनेची नागरी भागातील व ग्रामीण भागातील आस्थापनांची जी आकडेवारी सादर करण्यात आलेली आहे ती समाधानकारक नाही. नागरी व ग्रामीण भागातील आस्थापना या सहाव्या आर्थिक गणने पेक्षा सातव्या आर्थिक करण्यात अत्यंत कमी दाखवलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे जी आर्थिक गणना करण्यात आलेली आहे ती अत्यंत असमाधानकारक दिसून येत आहे. तरी पुन्हा संपूर्ण प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. त्याकरिता जिल्हा सांख्यिकी विभागाने शासनाला लातूर जिल्ह्यातील आर्थिक गणना करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत पत्र पाठवावे व त्याबाबतचा पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
लातूर जिल्ह्यात आर्थिक गणना करणाऱ्या संबंधित यंत्रणेने जो आर्थिक गणनेचा अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार आहे तो प्रशासनाकडून स्विकारला जाणार नाही. तसेच ही आर्थिक गणनेची प्रक्रिया सुरू असताना जिल्हा सांख्यिकी विभागाने नियंत्रण विभाग म्हणून अत्यंत चोखपणे जबाबदारी पार पाडणे आवश्यक होते. संबंधित यंत्रणेला वेळोवेळी सूचना करून आर्थिक गणनेची प्रक्रिया योग्य पद्धतीने बिनचूक करून घेणे आवश्यक होते असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी निर्देशित केले.
प्रारंभी सांख्यिकी विभागाचे संशोधन सहाय्यक श्री बोदडे यांनी लातूर जिल्ह्यात दिनांक 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत सातवी आर्थिक गणना राबविण्यात येत असल्याचे सांगून सुमारे 95 टक्के पेक्षा अधिक काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. तसेच या आर्थिक गणनेत नागरी भागात अहमदपूर येथे 231, औसा 1014, लातूर 16782, निलंगा 2161, उदगीर 461 इतक्या आस्थापना ची नोंदणी झाल्याचे सांगून ग्रामीण भागात अहमदपूर 880, औसा 916, चाकूर 1878, देवणी 1359, जळकोट 445, लातूर 2375, निलंगा 2509, रेनापुर 1364 व उदगीर 1208 अशा पद्धतीने आस्थापनांची ग्रामीण भागात नोंदणी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या आर्थिक गणनेचे जिल्हा समन्वयक रवींद्र भडंगे यांनी सातव्या आर्थिक गणनेत जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागात आस्थापनांच्या नोंदी कमी का झाल्या याविषयी सविस्तर माहिती देता आली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेचे विभागीय स्तरावरील प्रमुख यांना तात्काळ सक्षम उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी निर्देशित केले.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.