सायक्लोथोन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद हजारो लातूरकर झाले सहभागी लातूरसह इतर जिल्ह्यातील स्पर्धकांचाही सहभाग

 

सायक्लोथोन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद 

हजारो लातूरकर झाले सहभागी 

लातूरसह इतर जिल्ह्यातील स्पर्धकांचाही सहभाग

 महापौर-उपमहापौर, आयुक्तांनी सायकल चालवीत पूर्ण केली ९ किमी स्पर्धा










लातूर/प्रतिनिधी: 
   फिट लातूर, ग्रीन लातूर ही संकल्पना घेऊन माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन व इंडियन मेडिकल असोसिएशन व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या पहिल्या वहिल्या सायकलोथोन २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. ९ किलोमीटर,
३० किलोमीटर व ५०  किलोमीटर अशा तीन टप्प्यात आयोजित या स्पर्धेचा प्रारंभ जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, महापौर विक्रांत गोजमगुंडे,
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व आयुक्त अमन मित्तल, रोटरी क्लब चे अध्यक्ष अनुप देवनिकर, रोटॅक्ट क्लब चे अध्यक्ष प्रसाद वारद, आय एम ए चे अध्यक्ष डॉ विश्वास कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 
  यावेळी उपस्थित मान्यवरांसह सहभागी स्पर्धकांनीही फिट इंडिया, फिट लातूर व ग्रीन लातूर अशी शपथ घेतली. शहराला स्वच्छ,हरित,प्रदूषण मुक्त व निरोगी ठेवण्यासाठी ही शपथ घेण्यात आली. प्रदूषणाला आळा घालावा हाच या सायक्लोथोनचा मुख्य उद्देश होता.
  शहरातील हजारो नागरिक, तरुण तरुणी, उद्योजक, डॉक्टर, शासकीय अधिकारी,  महानगरपालिकेचे पदाधिकारी व विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनपाच्या स्वच्छता विभाग तसेच माझी वसुंधरा अभियानाची संपूर्ण टीम देखील यात सहभागी होती. रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन व आयएमएचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवला. लातुरसह उदगीर, रेणापूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातुनही स्पर्धक यात सहभागी झाले होते. हजारो स्पर्धकांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वी केली.
   स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ९ किलोमीटर, ३० किलोमीटर व ५० किलोमीटर या प्रत्येक टप्प्यासाठी पुरुष व स्त्रिया मधून प्रत्येकी तिघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. 

चौकट १
 पालकमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश.
  जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे या सायकलोथोन मध्ये सहभागी होणार होते परंतु तातडीच्या पक्ष बैठकीमुळे ते येऊ शकले नाहीत. पालकमंत्र्यांच्या वतीने शुभेच्छा संदेश पाठवण्यात आला होता.या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले.नागरिकांनी लातूर शहराला स्वच्छ,सुंदर,हरित व निरोगी ठेवावे.प्रदूषण वाढू वाढू नये याची काळजी घ्यावी,असे सांगून त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.


चौकट २
महापौरांचा सपत्नीक सहभाग.
  सायक्लोथोन स्पर्धेच्या आयोजनात महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा विशेष पुढाकार होता.केवळ आयोजनासाठी पुढाकार घेऊन ते थांबले नाहीत तर स्वतः सायकल चालवत त्यांनी यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे महापौर या स्पर्धेत सपत्नीक सहभागी झाले होते.महापौरांच्या अर्धांगिनी सौ. वर्षा यांची या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती होती. दोघांनीही ९ किमी अंतराचा टप्पा यशस्वीपने पार केला.


चौकट ३
ब्रँड ॲम्बेसिडरना सायकलींचे वितरण.
   महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत मागील २५ वर्षांपासून सायकलचा वापर करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांनाही सायकलोथोन स्पर्धेचे निमित्त साधून महानगरपालिकेच्या वतीने नवीन सायकलींचे वितरण करण्यात आले.

चौकट ४
महापौर, उपमहापौर, आयुक्तांनीही सहभाग घेत पूर्ण केली स्पर्धा.
माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत आयोजित सायक्लोथोन स्पर्धेस हजारो लातूरकरांनी सहभागी होत अभूतपूर्व प्रतिसाद दिला. 'फिट लातूर,
ग्रीन लातूर'संकल्पनेअंतर्गत आयोजित या स्पर्धेत लातूरसह इतर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले. महापौर विक्रांत गोजमगुंडे,
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी सायकल चालवत ९ किलोमीटर अंतराचा टप्पा पार पाडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या