लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळित
महापौरांनी मानले जिल्हाधिकाऱ्यांचे आभार
लातूर/
प्रतिनिधी:
युसूफ सय्यद
धनेगाव येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असून यामुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.थकीत वीज बिलापोटी महानगरपालिकेने ६०लाख रुपयांचा भरणा केला असून उर्वरित वीजबिल भरण्यासाठी महापालिकेला मुदत वाढवून मिळाली आहे. याकामी सहकार्य केल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
लातूर शहर पाणीपुरवठा योजनेचे एकूण २कोटी ६८ लाख रुपये वीजबिल थकीत आहे.मोठ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा धोरणानुसार शुक्रवारी सायंकाळी महावितरणने लातूर शहर पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला होता. धनेगाव येथून कळंब तसेच इतर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचाही विद्युतपुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील पाणी वितरणाची व्यवस्था विस्कळीत झाली.
हा पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी महानगरपालिकेकडून महावितरणला विनंती करण्यात आली.सोमवार किंवा मंगळवारी ६० लाख रुपये भरण्याचे पत्रही महापालिकेकडून देण्यात आले.याशिवाय पालिकेच्यावतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना महावितरणशी बोलण्याची विनंती केली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी.यांनी औरंगाबाद येथील महावितरणच्या सहसंचालकांशी चर्चा केली. मनपास वीजबिल भरण्यास त्यांनी मुदतवाढ मिळवून दिली.पुढील दोन महिन्यात पुर्ण थकबाकी भरण्याचे हमीपत्र महानगर पालिकेच्या वतीने महावितरणला देण्यात आले आहे.
त्यामुळे रविवारी सकाळी ११:३० वाजता धनेगाव येथील एक्सप्रेस फिडर लाईन वरून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात पंपिंग सुरु झाले.दुपारी दीड ते दोन वाजे दरम्यान धनेगाव येथून पाणी लातूर शहरात दाखल झाले.वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे बसवेश्वर कॉलनी, शासकीय कॉलनी व राजधानी हॉटेल येथील पाण्याच्या टाक्यावरून होणारा पाणीपुरवठा थांबला होता.या टाक्या तातडीने भरून घेत लगेचच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
शहरातील नागरिकांकडे जवळपास ६७ लाख रुपयांची पाणीपट्टी बाकी आहे.नागरिकांनी आपल्याकडील पाणीपट्टीचा लवकरात लवकर भरणा करावा.पालिकेचे कर्मचारी वसुलीसाठी घरोघर येत आहेत परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. विद्युत पुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी नागरिकांनी आपल्याकडील पाणीपट्टी वेळेवर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे,असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.