जनता कर्फ्यूला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरोनाची साखळी तोडण्यात ठरणार महत्त्वाचा टप्पा
लातूर/प्रतिनिधी: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूरकरांनी जनता कर्फ्यूचे उस्फूर्तपणे पालन केले. व्यावसायिक व दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवली. नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले. याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरकर जनतेचे आभार व्यक्त केले.
लातूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. विशेष म्हणजे या संदर्भात सक्ती करणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असूनही परीस्थिती नियंत्रणात आहे. असे असले तरी भविष्यात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी हा जनता कर्फ्यू पाळण्यात आला.
शनिवारी जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी लातूरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह गंजगोलाई, आडत बाजार, हनुमान चौक, सुभाष चौक, मुख्य रस्ते आणि इतर भागातील दुकानदारांनीही आपापली दुकाने उघडली नाहीत. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या.
प्रशासनाच्या आवाहनास सामान्य नागरिकांनीही प्रतिसाद दिला. नागरिक घराबाहेर पडले नाहीत. यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. पोलीस प्रशासनही सतर्क होते.
दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूमधील पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला. कोरोनाची रुग्णसंख्या वाढू न देण्यात जनता कर्फ्यूचा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाची दुसरी लाट किंवा रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात बहुधा कुठेही जनता कर्फ्यू पालन करण्यात आला नाही. असा जनता कर्फ्यू पाळणारे लातूर हे बहुधा पहिलेच असावे असे सांगून जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरकरांचे आभार मानले. रविवारीही अशाच पद्धतीने जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.