औशाच्या कोव्हिड सेंटर मध्ये योगाच्या साह्याने समुपदेशन..
औसा प्रतिनिधी /-औसा येथील कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांना मानसिक आधार देवून त्यांच्या मध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी योगाच्या माध्यमातून समुपदेशनाचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोव्हिड -19 मुळे मागील वर्षभरात सर्वत्र भीतीचे सावट पसरले आहे. एक महिन्यापासून राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोना बाधितांवर वेळोवेळी उपचार व जेवणाची व्यवस्था करीत असतानाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना योगा आणि प्राणायाम प्रशिक्षणातून त्यांचे समुपदेशन करून रुग्णांना श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर आर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्वाती फेरे (समुदाय अधिकारी नांदुर्गा) यांनी योगा प्राणायाम बद्दल मार्गदर्शन सुरू केले आहे. तसेच डॉ. संजय मस्के(ग्रामीण रुग्णालय औसा) , श्रीमती अंजली हत्ते, मल्लिकार्जुन रोडगे यांनी कोव्हिड केअर सेंटर मध्ये दाखल झालेल्या कोरोना बाधितांना योगा प्राणायामचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या महाभयंकर संसर्ग विषाणूपासून स्वतःसह कुटुंब याचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकांनी शारीरिक आंतर पाळणे व आरोग्य सेतू ॲप नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. याबद्दल उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना सविस्तर माहिती दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.