लॉकडाउन नको : सुविधा उपलब्ध करून द्या,अन्यथा रस्त्यावर उतरू -
बहुजन वंचित आघाडीची पत्रकार परिषद
लातूर / प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉक डाऊन पर्याय नाही, नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
संपूर्ण देशासह राज्यात मागील वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे, यादरम्यान अनेक दिवस लॉकडाऊन लावण्यात आला, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला का असा सवाल उपस्थित करून लॉक डाऊन, कठोर निर्बंध यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, भाजी, फळ विक्रेते, फेरीवाले, वेठ बिगार कामगार, हॉटेल, पान टपरी,छोटे व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, यांचे व्यवसाय बंद करण्यापेक्षा यांच्यावर कठोर निर्बंध लादून यांची दुकाने चालू करण्यात यावी अशी मागणी यावेळी पांचाळ यांनी केली.
मोठ्या शहरात ज्याप्रमाणे तपासणी केली जात आहेत त्याप्रमाणे तपासण्या वाढवून कोरोनासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे, वंचित आघाडीच्या वतीने आम्ही लोकांसमोर जाऊन कोरोना महामारीला सामोरे जाण्याचे आवाहन करणार असल्याचे यावेळी सांगितले, मागील काही दिवसांपूर्वी अहमदपूर तालुक्यातील कोपरा याठिकाणी जी घटना घडली त्याला राजकीय वळण लावण्यात आले, सदर गावामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीय वाद नाही, तिथे अद्याप शांतता असल्याचे यावेळी सांगितले.
कोरोनाच्या नावावर सरकारचे प्रतिनिधी किंवा येथील वरिष्ठ अधिकारी विनाकारण छोट्या व्यावसायिकांना वेठीस धरत आहेत, या ठिकाणी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यक्रम,आंदोलन होताहेत यावेळी हे निर्बंध कोठे जातात, या अधिकाऱ्यांना दिसत नाही का, छोटे छोटे व्यवसाय ही आमच्या बहुजनांच्या उदरनिर्वाहाची साधन आहे, ही बंदी उठवावी, येणाऱ्या काळात राष्ट्रपिता महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व नियमांचे काटेकोर पालन करून धुमधडाक्यात साजरी करणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड, जिल्हा संघटक सचिन लामतुरे, नितीन गायकवाड आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.