पेरणी. साहित्य खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांची हमालाकडून आर्थिक लुट

 

पेरणी. साहित्य खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांची  हमालाकडून आर्थिक लुट




औसा/प्रतिनिधी ः- खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आला असून पेरणीसाठी आवश्यक असणारी बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करू लागलेले आहेत. यादरम्यान पेरणी साहित्य खरेदी करण्यास गेलेल्या शेतकर्‍यांची हमालाकडून आर्थिक लुट होऊ लागलेली असून याबाबत दुकानदारांने हमालाना मजूरी द्यावी त्याचा भार शेतकर्‍यांवर नसावा अशी मागणी होऊ लागलेली आहे.
जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा कष्टकरी म्हणून ओळखला जातो. शेतीसाठी नेहमीच कष्ट उपसणारा शेतकरी सद्या खरेदीपाच्या पेरणीसाठी आवश्यक असणारी बी-बियाणे,खते व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करू लागलेला आहे. लवकरच मान्सूनचे आगमन होईल आणि वेळेवर पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त होत आहे. त्यामुळेच खरीपाच्या पेरणीसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य गोळा करून ठेवण्यासाठी शेतकरी मग्न झालेले आहेत. खरेदीसाठी शेतकरी बाजारात गेल्यानंतर फर्टिलायझर दुकानातून खरेदी केलेली खते व बियाणे बैलगाडीत अथवा ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी हमालाला दुकानदाराकडून सांगितले जाते. मात्र ही हमाल मंडळी शेतकर्‍यांकडून ती खते व बियाणे टाकण्यासाठी पैशासाठी तगादा लावत असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे. शेतकर्‍यांने पैसे देण्यास नकार दिल्यास हमालाकडून अरेरावीची भाषा होऊ लागली आहे. कांही वेळा तर चक्क शेतकरी व हमाल यांच्यामध्ये वादही होत असल्याचे चित्र पहाण्यास मिळत आहे.
वास्तविक ज्या दुकानातून शेतकर्‍यांनी खरेदी केलेली आहे त्याच दुकानदारांनी हमालाला पैसे देणे अपेक्षीत आहे. मात्र नेहमीच संकटाला सामोरे जाणार्‍या शेतकर्‍याबद्दल या दुकानदारांनाही कांही देणे-घेणे नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. याबाबत कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालून शेतकर्‍यांच्या होणार्‍या आर्थिक लुटीस चाप बससावी अशी मागणी होऊ लागलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या