आता बांधकाम परवाना केवळ ऑनलाइन महापौरांचे मनपा प्रशासनास निर्देश

 अता बांधकाम परवाना केवळ ऑनलाइन


 महापौरांचे मनपा प्रशासनास निर्देश








 लातूर/प्रतिनिधी: महानगरपालिकेच्या वतीने दिला जाणारा बांधकाम परवाना ऑनलाइन पद्धतीनेच देण्याचे निर्देश महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रशासनास दिले आहेत.दि. १ सप्टेंबर पासून हा आदेश लागू होणार असून आता ऑफलाईन पद्धतीने मिळणारा बांधकाम परवाना बंद होणार आहे. 
   लातूर शहर महानगरपालिकेने पारदर्शक कामकाज करण्याच्या हेतूने बांधकाम परवाना ऑनलाइन पद्धतीने देण्याची पद्धत अवलंबिण्यात आली होती. परंतु दरम्यानच्या काळात राज्य शासनाच्या वतीने नव्याने बांधकाम नियमावली जाहीर करण्यात आली. याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला.त्यामुळे बांधकाम परवाना ऑनलाइन देण्याची पद्धत महानगरपालिकेच्या वतीने काही कालावधीसाठी स्थगित करण्यात आली होती. या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने परवाने दिले जात होते.
  परंतु आता दि.१ सप्टेंबर पासून ऑफलाइन पद्धतीने बांधकाम परवाने न देता केवळ ऑनलाईन पद्धतीनेच ते दिले जावेत,
असे कडक निर्देश महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने मिळणारा बांधकाम परवाना आता बंद होणार आहे.
    दि.१ सप्टेंबर म्हणजेच बुधवारपासून ही पद्धत बंद केली जाणार आहे. शहरातील नागरिकांनी बांधकाम सुरू करण्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने रीतसर अर्ज करून परवाना घ्यावा. प्रशासनाने केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्यांना परवाने द्यावेत,असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आदेशित केले आहे.
 ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवाना मिळणार असल्यामुळे नागरिकांचीही सोय होणार आहे. परवान्यासाठी आता कोणालाही महानगरपालिका कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही.प्रक्रियेसाठी लागणारा कालावधीही कमी होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवाना घ्यावा,असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या