जागतिक हृदय दिन विशेष लातुरात प्रथमच एक वर्षाच्या बालकाची ओपन हार्ट सर्जरी

 जागतिक हृदय दिन विशेष 



लातुरात प्रथमच एक वर्षाच्या बालकाची ओपन हार्ट सर्जरी विवेकानंद रुग्णालयात एकाच दिवशी झाल्या पाच हृदयशस्त्रक्रिया

 लातूर/प्रतिनिधी: 

ओपन हार्ट सर्जरी अर्थात हृदय शस्त्रक्रिया ही अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची असते. त्यातच लहान मुलाची ओपन हार्ट ही तर काळजीत टाकणारीच ! लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात डॉक्टरांनी एक वर्षाच्या बालकाची टेट्रॉलॉजी ऑफ फेलॉट नावाच्या हृदयविकारसाठी ओपन हार्ट सर्जरी करून बालकाला जीवदान दिले. 

विशेष म्हणजे रुग्णालयात एकाच दिवशी (२६ सप्टेंबर २०२१ रोजी) बालकांच्या विविध प्रकारच्या पाच हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या.यात एक ओपन हार्ट आणि चार बिनटाक्याच्या हृदयशस्त्रक्रिया केल्या गेल्या.

टेट्रॉलॉजी ऑफ फेलॉट (Tetralogy Of Fallot / TOF) या हृदयाच्या आजारामध्ये बालकाच्या हृदयामध्ये चार दोष असतात. यामध्ये हृदयात मोठे छिद्र असणे, हृदयाच्या उजव्या बाजूची झडप अरुंद असणे व डाव्या बाजूची झडप उजवीकडे सरकलेली असणे तसेच हृदयाच्या उजव्या बाजूचे स्नायू अधिक जाडीचे असतात.अशा आजारासाठी औषधोपचार पुरेसे ठरत नाहीत. एवढेच काय बिनटाक्याची शस्त्रक्रियाही शक्य नाही. त्यासाठी ओपन हार्ट सर्जरी हा एकमेव पर्याय असतो. या शस्त्रक्रियेला टेट्रॉलॉजी ऑफ फेलॉट सर्जरी म्हटले जाते. या शस्त्रक्रियेनंतर हार्ट पूर्णपणे सामान्य होते. वृद्ध नागरिकांच्या हृदयविकारासाठी ज्या पद्धतीने ओपन हार्ट सर्जरी बायपास केली जाते त्याच पद्धतीने ही सर्जरी होते.

   चाकूर तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील एक वर्षाच्या मुलाला हा आजार झालेला होता. या रोगाचे निदान डॉ. नितीन येळीकर, मुलांचे हृदय रोगतज्ज्ञ यांनी केले आणि बालकास शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्यामुळे बालकास शस्त्रक्रियेसाठी लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयातून आलेले मुलांचे ऱ्हदय शल्य चिकित्सक डॉ. धनंजय माळणकर, मुलांचे हृदय रोगतज्ज्ञ डॉ. मंगलेश निंबाळकर, भूलतज्ज्ञ डॉ. शिवाजी माळी, दिनेश के व जिनिल राज, यांच्यासह विवेकानंद रुग्णालयातील मुलांचे हृदय रोगतज्ज्ञ डॉ. नितीन येळीकर, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. औरंगाबादकर यांच्या चमूने त्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. बालकाची प्रकृती व्यवस्थित असून एक-दोन दिवसात त्याला रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार आहे. शस्त्रक्रियेदरम्यान विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टर्स, व्यवस्थापन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

    याच दिवशी बालकांच्या हृदयाचे छिद्र बुजवण्याच्या बिनटाकयाच्या ४ शस्त्रक्रियाही रुग्णालयात पार पडल्या. या चारही बालकाची रुग्णालयातून सुट्टी झाली. विशेष म्हणजे या सर्व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मोफत करण्यात आल्या.

  पूर्वीच्या काळी पुणे- मुंबई किंवा हैदराबाद येथे जाऊन कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया आता विवेकानंद रुग्णालयात होत आहेत. लातूरसह मराठवाडा आणि सीमावर्ती भागातील रुग्णांना याचा मोठा लाभ होत आहे. यापुढेही अशा शस्त्रक्रिया विवेकानंद रुग्णालयात होत राहतील व याचा गरजू रुग्णाना फायदा होईल,असे मुलांचे हृदय रोगतज्ज्ञ डॉ. नितीन येळीकर या वेळी म्हणाले. 

पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ.अरुणा देवधर, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. राधेश्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या