शेतकर्‍यांना नुकसनपोटी आलेली रक्कम दिवाळीपुर्वी आणि विनाकपात देण्यात यावी-आ. संभाजी पाटील निलंगेकर रक्कम कपात होऊ नये याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन

 

शेतकर्‍यांना नुकसनपोटी आलेली रक्कम दिवाळीपुर्वी आणि विनाकपात देण्यात यावी-आ. संभाजी पाटील निलंगेकर
रक्कम कपात होऊ नये याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन 



लातूर/प्रतिनिधी ः- अतिवृष्टी आणि पुरस्थिती यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले असून अनेकांच्या जमीनी खरडून गेल्या आहेत. या शेतकर्‍यांना हेक्टरी पंन्नास हजाराची मदत मिळावी याकरीता 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. मात्र सरकारने केवळ हेक्टरी दहा हजार रुपये मदत दिलेली असून याकरीता जिल्ह्याला 600 कोटी रुपयाची रक्कम मिळालेली आहे. या मदतीची रक्कम दिवाळीपुर्वी आणि कोणतीही कपात न करता देण्यात यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली असून रक्कम कपात होऊ नये याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आ. निलंगेकर यांनी दिलेला आहे.
अतिवृष्टी आणि शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली पुरस्थिती या कारणाने लातूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली खरीपाची पिके वाहून गेलेली आहेत. विशेषतः सोयाबीनची पेरणी केलेल्या शेतकर्‍यांना याचा जबर फटका बसला आहे. त्याचबरोबर अनेकांच्या जमीनी वाहून आणि खरडून गेलेल्या आहेत. या शेतकर्‍यांना सरकारच्या वतीने हेक्टरी पंन्नास हजार रुपये मिळावी याकरीता लातूर येथील शिवाजी चौकात 127 शेतकर्‍यांना सोबत घेऊन 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या शेवटच्या दिवशीच राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या मदतीसाठी दहा हजार कोटी रुपयाचे तोकडे पॅकेज घोषीत केले. या पॅकेजच्या माध्यमातून शेतकर्‍यांना हेक्टरी दहा हजार रुपये म्हणजे एकरी चार हजार रुपय तुटपुंजी मदत मिळणार आहे. वास्तविक या मिळणार्‍या मदतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना पेरणीसाठी आणि काढणीसाठी होणारा खर्चही भरुन निघणार नाही. सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार याचा पहिला टप्पा म्हणजे 25 टक्के रक्कम 600 कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत.
शेतकर्‍यांना नुकसपोटी आलेली या मदतीची रक्कम तात्काळ म्हणजेच दिवाळीपुर्वी त्यांच्या खात्यात जमा होऊन शेतकर्‍यांना ती विनाकपात प्राप्त व्हावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांना केलेली असून याबाबतची माहिती फेसबुक लाईव्हच्याद्वारे आ. निलंगेकरांनी दिले. शेतकर्‍यांना कोणत्याही मदतीपोटी किंवा नुकसानभरपाई म्हणून सरकारकडून जी रक्कम मिळते ती शेतकर्‍यांना विनाकपात मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदतीची रक्कम देताना त्यातून कपात करण्यात येते ही बाब यापुर्वीही निदर्शनास आली आहे. आधीच अस्मानी व सुल्तानी संकटामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी जिल्हा बँकेच्या कपातीच्या धोरणामुळे आणखीन अडचणीत येणार आहे. त्यामुळेच जिल्हा बँकेसह कोणत्याही बँकेच्या शाखेतून शेतकर्‍यांना मदतीपोटी आलेल्या रक्कमेतून कपात होऊ नये याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे त्याचबरोबर याबाबत कोणत्या तक्रारी आल्यास आम्हाला पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल असा इशारा आ. निलंगेकर यांनी दिलेला आहे. सदर रक्कम दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांच्या हाती पडावी अशी मागणीही करत मदतीपोटी मिळणार्‍या रक्कमेबाबत शेतकर्‍यांच्या अडचणी अथवा तक्रारी असल्यास त्यांनी तात्काळ भाजपा लोकप्रतिनिधीशी संपर्क साधावा असे आवाहनही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या