शहर स्वच्छतेसाठी मनपाची अनोखी स्पर्धा !
८७ नागरिकांनी जिंकली चांदीची नाणी
कचरा वर्गीकरण करून घंटागाडीला देण्याचे मनपाचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी:आपल्या घरातील ओला,सुका व घातक कचरा नियमितपणे वेगवेगळा करून देणाऱ्यांसाठी लातूर शहर मनपाने घेतलेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून शहराच्या चार झोनमधून ८७ नागरिक यात विजेते ठरले आहेत.या सर्वांना चांदीची नाणी वितरित करण्यात आली आहेत.शहरातील नागरिकांनी यापुढेही कचरा वर्गीकरण करूनच घंटागाडीला देण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
लातूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मनपाच्या वतीने ही अनोखी स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. आपल्या घरातील ओला, सुका व घातक कचरा वेगवेगळा करून देणाऱ्यांना या अंतर्गत कूपन देण्यात आले होते.ही सर्व कुपन एकत्रित करून त्याचा लकी ड्रॉ काढण्यात आला.यामध्ये चार झोनमधील ८७ नागरिक विजेते ठरले.शहरातील चारही झोनमध्ये नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन करून विजेत्या नागरिकांना चांदीच्या नाण्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले.
यापुढील काळातही नागरिकांनी आपल्या घरातील कचरा ओला-सुका व घातक असे वर्गीकरण करून घंटागाडीकडे द्यावा. आपले लातूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करावी,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.