सर्दी, पडसे, तापावर घरच्या घरीच उपचार सुरू; दवाखाने पडले ओस

 सर्दी, पडसे, तापावर घरच्या घरीच उपचार सुरू; दवाखाने पडले ओस



वडवणी (प्रतिनिधी):- सर्दी, पडसे, तापावर घरच्या घरीच उपचार सुरू असल्याने दवाखाने ओस पडले आहेत. चार आण्याच्या कोंबडीसाठी बारा आण्याच्या मसाला घेण्याची नागरिकांची मानसिकता आता संपली आहे. सध्या एकही घर असं नाही की जिथे आजारी माणूस नाही. गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्येक घरात किमान एक माणूस आजारी आहे, सर्दी ताप, खोकला, अंगदुखी यापैकी एकतरी लक्षण कोणाला न कोणाला आहेच! एका बाजूला रुग्णांची ही अवस्था असताना दवाखाने, खासकरून खाजगी कोविड स्पेशल दवाखाने ओस पडून आहेत, आयपीडी तर सोडाच पण ओपीडीमध्ये यायला रुग्ण तयार नाहीत! लोकांना आता आपणास सर्दी, पडसे, ताप, अंगदुखीची लक्षणे आहेत याची खात्री झाली आहे. म्हणूनच की काय, खासगी दवाखान्यांचे उंबरठे


न झिजविता चार आण्याच्या कोंबडीसाठी बारा आण्याचा मसाला कशासाठी ? या उक्तीचा नागरिक पुरेपूर अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे. खरं सांगायचं म्हणजे निर्माण झालेल्या व्हायरसची क्षमता, त्याची ताकद फार कमी झाली आहे, या विषाणूने मानवी शरीराशी जुळवून घेण्यात जवळपास यश मिळविले आहे व्हायरस माणसाळला आहे असंही अनेकजण बोलू लागले आहेत गेल्यावर्षी कोरोनाची भरपूर मार्केटिंग करण्यात आली. लोकांना घाबरविण्यात आले. धास्तीमुळे अनेकांचे बळी गेले, एकाही दवाखान्यात बेड शिल्लक नव्हता. ऑक्सीजनचा तुटवडा सुरू झाला होता. परंतू आता मात्र भिती दाखवूनही लोक दवाखान्याचे तोंड बघायला तयार नाहीत. त्यामुळे अनेकांची दुकानदारी आता बंद झाली असून कोरोना आता स्वस्त झाला असेच म्हणावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या