पीकविमा भरतेवेळी शेतकऱ्यांची फसवणूक न्याय मिळवून देण्याचे शेतकऱ्यांचे ग्राहक पंचायतीला साकडे

 


पीकविमा भरतेवेळी शेतकऱ्यांची फसवणूक

न्याय मिळवून देण्याचे शेतकऱ्यांचे ग्राहक पंचायतीला साकडे




  लातूर/प्रतिनिधी:अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथे पीकविमा भरताना दुकानदाराने पैसे घेऊन बोगस पावत्या देत शेतकऱ्यांची फसवणूक केली.यामुळे शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित राहिले असून या प्रकरणी न्याय मिळवून द्यावा,असे साकडे शेतकऱ्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला घातले आहे.याप्रकरणी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे.
  ढाळेगाव येथील शेतकऱ्यांनी अहमदपूर येथील नॅशनल ऑनलाइन सेंटर येथे दि.१४ जुलै रोजी ऑनलाइन पद्धतीने पीकविमा भरला.त्यासाठी आवश्यक असणारा सातबारा ८ अ चा उतारा,बॅंक पासबूक आणि आधार कार्ड अशी कागदपत्रे दिली.दुकान चालक शेख समीर मोहिदोद्दिन (काझी) याने शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन पावत्याही दिल्या.पावती मिळाल्यामुळे आपला विमा भरला गेला आहे या समजातून शेतकरी निश्चिंत राहिले.सर्व शेतकऱ्यांना विमा मिळूनही ढाळेगाव येथील शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही.यासंदर्भात चौकशी केली असता शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पोच पावत्या नोंदणीकृत नसून बनावट आहेत तसेच शेतकऱ्यांनी विमा भरल्याची कंपनीकडे कसलीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
   याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली.ग्राहक पंचायतीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य शिवराज शेकडे व अहमदपूर शहर उपाध्यक्ष तुकाराम कदम यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली.याबाबत
जिल्हाधिकारी,तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी,आ. बाबासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
  या निवेदनावर पंडित कदम, मिनाबाई कदम,आकाश कदम,सुहान कदम,गोदावरी कदम,पार्वती कदम,संभाजी कदम,रामचंद्र शेकडे, केवळबाई शेकडे,केराबाई भिंगे,ईश्वर माने यांच्यासह २३  शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  या प्रकरणाचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू,अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या