सासू-सूनेच्या आत्मीयतेतून घरामध्ये स्वर्ग अवतरेल-डॉ.जनार्दन वाघमारे
लातूर ः सासू-सूनेचे नाते अनादि काळापासून वैरभावाचे वाटते. पण या नात्यात तडजोड, संयम, समजूतदारपणा आणि आत्मियता असेल तर घरामध्ये स्वर्ग अवतरेल असे मत डॉ.जनार्दन वाघमारे यांनी व्यक्त केले. मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूर व शिवाई प्रतिष्ठान लातूर यांच्या संयुक्तपणे आयोजित सौ.उषा किशनराव भोसले लिखित ‘सासू-सून मनांची गुंफण’ या ललितगद्य लेख पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवार दि.17 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4.30 वाजता मानस फंक्शन हॉल, बार्शी रोड, लातूर येथे संपन्न झाला.
या प्रकाशन समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा.चंद्रकलाताई भार्गव या पुस्तकावर प्रमुख भाष्यकार म्हणून समीक्षक डॉ.जयद्रथ जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे, संस्कार प्रकाशनाचे ओमप्रकाश जाधव, शिवाई प्रतिष्ठानच्या डॉ.सुरेखा निलंगेकर आणि लेखिका सौ.उषा भोसले व्यासपीठावर उपस्थित होत्या. प्रा.चंद्रकला भार्गव यांनी ‘सासू सून मनांची गुंफण’ हे पुस्तक म्हणजे आजच्या कौटुंबिक समस्यांवरील एक उपाय समजावे. घराघरातील आजी-आजोबा यांच्याकडून होणारे संस्कार आज राहिले नाहीत. संस्काराची रिकामी जागा भरून काढत, सासू-सूनेच्या नात्यांमध्ये संस्कारांचा, समजुतदारपणाचा पूल निर्माण करण्याचे काम हे पुस्तक करेल. सासू होण्यापूर्वी सासूने तर सून होण्यापूर्वी सुनेने हे पुस्तक वाचावे असे त्या म्हणाल्या. डॉ.जयद्रथ जाधव म्हणाले की, सासू सून मनांची गुंफण हे ललित लेखनाचे पुस्तक कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सासू सून ही नाती कुटुंबाची मुख्य आधार असून ती दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतात. सासू सून यांच्या दोन पिढ्यांतील अंतर कमी करून सासू सूनेच्या नात्याला माय लेकीच्या नात्याने समजून घेण्याचा संस्कार हे पुस्तक करते. भारतीय समाजात सून या नात्यासंबंधी फार कमी बोलले जाते. स्रियांचा आई, बहिण व लेक म्हणून जितका गौरव होतो तितका सून व पत्नी म्हणून होत नाही. सासू सूनेचे नाते संवेदनशील आहे पण सासूने सुनेला पारखून घेतले आणि सुनेने सासूला समजून घेतले तर कुटुंबात सुखाची बरसात होईल. सासू सूनेच्या नात्याविषयी जात्यावरच्या ओवीमधून आलेल्या भावनाही या निमित्ताने डॉ.जाधव यांनी सांगितल्या. सौ.उषा भोसले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लालित्यपूर्ण आणि कौटुंबिक संस्कारासाठी हे ललित लेखन केले आहे. हे पुस्तक कौटुंबिक सुखाचा आधार ठरवा इतके ते महत्वाचे आहे.
यावेळी डॉ.जनार्दन वाघमारे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, काही पुस्तके चघळण्यासाठी असतात, काही वाचण्यासाठी असतात तर सासू सून मनांची गुंफण हे पुस्तक वैचारिकदृष्ट्या पचन करण्यासाठी आहे. या पुस्तकाच्या सत्तावीस लेखांमधून उषा भोसले यांनी लालित्यपूर्ण भाषेतून सासू सूनेच्या नात्यांवर प्रकाश टाकला आहे. स्रीमुळे नाती निर्माण होतात, स्रीमुळेच नाती टिकतात म्हणून स्री कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. संसारिक स्त्रियांना समुपदेशक म्हणून या पुस्तकाचा पुढील पिढ्यांना उपयोग होईल इतकी या पुस्तकाचे मोठेपण आहे. या कार्यक्रमाला लातूर मधील डॉक्टर, इंजिनिअर, प्राचार्य, प्राध्यापक, वकील, पत्रकार आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील विद्वान श्रोते मंडळी उपस्थित होते. या प्रसंगी श्रीमती सुशीलादेवी राऊत व डॉ.शुभांगी राऊत यांचा आदर्श सासू सून म्हणून सत्कार करण्यात आला. सासू म्हणून श्रीमती सुशीलादेवी राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाई प्रतिष्ठानच्या डॉ.स्नेहल देशमुख यांनी ही सासू नात्याविषयी मनोगत व्यक्त केले.
कळंबच्या उपजिल्हाधीकारी सौ.अहिल्या गाठाळ (होळे), प्रा.नानासाहेब गाठाळ, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, शाहुराज पवार, दै.पुढारी वृत्तसंपादक डॉ.हंसराज बाहेती, माजी शिक्षण अधिकारी रामराव लगड, वसंतरावजी पाटील, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत साळुंखे, उपप्राचार्य दासराव सूर्यवंशी, अॅड. धर्मवीर जाधव, अॅड.पंडितराव कर्डिले, विजयकुमार कोरे, उपसंचालक डॉ.एस.एस.पाटील, भुलतज्ञ गारठे, डॉ.वारद, डॉ.सचिन चव्हाण, डॉ.आनंद गोरे, डॉ.राजकुमार दाताळ, डॉ.राऊत, डॉ.स्नेहल देशमुख, डॉ.राम जावळे, डॉ.रमेश जाजू, डॉ.प्रेम तोष्णीवाल, डॉ.मालपाणी, रमेश चिल्ले, इंजि.कलवले साहेब, सूर्याजी शिंदे, विश्वंभरराव वराट, इसाक पटेल, अशोकराव कदम, इंजि.पौळ, श्री.जाधव, श्री.साठे, डॉ.गोपाळराव पंडगे व डॉ.आर.एन.वाघमारे आणि डॉ.अरब ए.टी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखिका सौ.उषा भोसले यांनी केले. सूत्रसंचालन सौ.सुनिता देशमुख तर आभार मराठवाडा साहित्य परिषदेचे सचिव डॉ.दुष्यंत कटारे यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.