*ग्रंथ हे माणसाचे व्यक्तिमत्त्व फुलवतात*
- नागेश मापारी
दि. १७, ग्रंथ हे माणसाचे व्यक्तिमत्त्व फुलवतात तर अनुभवातून शिक्षण हे विद्यार्थ्यांला सर्वगुण संपन्न बनवत असते. ज्ञानाचा प्रकाश देणारे ज्ञानप्रकाश ग्रंथालय आणि विद्यार्थांना ज्ञानाच्या आधारे आत्मनिर्भर बनवणारे ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन यामुळे आज मी एका प्रयोगशील शाळेत आल्याचे मला समाधान वाटते. एकूणच या शाळेचे अनोखे उपक्रम, यातून घडलेले विद्यार्थी आणि त्यांनी वाचणाबद्दलचे केलेले अनुभव कथन हे ऐकून आपणही या शाळेत प्रवेश घेवून हे अनुभवाचे शिक्षण घ्यावे याचा मोह आवरत नाही, असे मत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री नागेश मापारी यांनी व्यक्त केले. ते आज ज्ञानप्रकाश ग्रंथालय, आणि ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प चे ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, प्रकाश नगर लातूर येथे ग्रंथालय शाळेच्या द्वारी या उपक्रमात बोलत होते.
अध्यक्ष स्थानी ज्ञानप्रकाश ग्रंथालयाचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष वात्रटिकाकार, कवी भारत सातपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री सुनील गजभारे म्हणाले की, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात वाचन संस्कृती वाढावी या हेतूने शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. ज्या ज्या गावात शासन मान्य ग्रंथालये आहेत त्या ग्रंथालयांनी त्या गावातील शाळेत ग्रंथ प्रदर्शन लावावे व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना सभासद करून घ्यावे. आमच्या जिल्हा ग्रंथालयाला ही आपल्या शाळेची भेट आयोजित करावी असे जाहीर आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्ष पदावरून बोलताना कवी भारत सातपुते यांनी वाचन संस्कृती बाबत आपल्या वात्रटिका सादर करून आपल्या भागातील ज्ञानप्रकाश हे समृध्द ग्रंथालय आणि ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन ही नवनवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडवणारी प्रयोगशील शाळा आहे. विद्यार्थ्यांनी अल्पदरात या ग्रंथालयाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि आपल्या पालकांना रिचार्ज पेक्षाही कितीतरी कमी दरात ज्ञानाचे भांडार खुले असल्याची माहिती द्यावी आणि वाचन संस्कृती वाढवावी असे आवाहन केले. प्रारंभी शिवछत्रपती वाचनालयाचे माजि ग्रंथपाल पांडुरंग अडसुळे यांनी संत तुकाराम यांचे अभंग व म. फुल्यांचे विचारधन यातून वाचनाचे महत्व सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी केले, शाळेत नावीन्यपूर्ण दिल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती प्रकल्प संचालक सतीश नरहरे यांनी दिली, दोन मुलींनी अनुभव कथन केले, सूत्र संचालन भाग्यश्री कुलकर्णी तर आभार मुख्याध्यापिका सविता नरहरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगल बावगे व अशोक गुरदाळे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी शाळेतील चारशेहून अधिक मुलं, मुली, शिक्षक उपस्थित होते.
--------------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.