संभाजीराव....... लातूरच्या सुसंस्कृत परंपरेला डाग तुमच्याकडून अपेक्षित नाही !

 संभाजीराव.......

लातूरच्या सुसंस्कृत परंपरेला डाग तुमच्याकडून अपेक्षित नाही !


जावेद शेख






लातूर - लातूर शहरात यंदा शिवजयंती नेहमीप्रमाणे उत्साहात साजरी झाली.मात्र या जयंतीला गालबोट हैद्राबाद येथील वादग्रस्त व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार राजसिंह ठाकूर यांच्यामुळे लागले.व साजरी झालेली शिवजयंती ठराविक एक समाजाला टार्गेट करण्यासाठी,शहरातील जातीय सलोखा नष्ट करण्यासाठी,जी लातूरची परंपरा आहे त्याला तडा देण्यासाठी कांही नासक्या कांद्यानी,डोक्यात शेण भरलेल्यानी केली असाच अर्थ निघतो आहे.व या सर्वांना माजी मंत्री व ज्यांची प्रतिमा लातूरमध्ये गेल्या कांही काळात सर्व जाती,धर्माला सोबत घेऊन जाऊ शकतो असा नेता अशी तयार होत होती,अश्या संभाजी निलंगेकर पाटील यांचा पाठिंबा होता किंवा त्यांनीच स्क्रिप्ट तयार केली होती असाच अर्थ लातूरमध्ये काढला जातोय.व आमदार राजसिंह ठाकूर यांना लातूरला आणायची गरज संभाजी निलंगेकर पाटील यांना काय होती असा प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे.त्याला कारण लातूर हे खूप शांत शहर आहे,येथे जातीय तेढ,दंगल कधीही होत नाही.मग असे असताना वादग्रस्त व्यक्तीला आणून एक ठराविक समाजाला टार्गेट केले गेले,जातीय तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला,तो देखील अठरा पगड जातीला सोबत घेऊन राज्य करणाऱ्या शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी व त्यांच्या पुतळ्यासमोर थांबून.ज्यातुन लातूरच्या सुसंस्कृत परंपरेला कोठेतरी नक्कीच तडा देण्याचा प्रयत्न केला गेला व हे संभाजी निलंगेकर पाटील यांच्याकडून अपेक्षित नव्हते असेच प्रत्येकजण बोलतोय, अर्थात त्याला कारण देखील संभाजी निलंगेकर पाटील यांनीच दिलंय किंवा तशी वेळ आणलीय .कोणी कांही जरी दावा केला तरी ज्याअर्थी तुम्ही शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या चबूतऱ्याचा वापर व्यासपीठ म्हणून करता,आमदार राजसिंह ठाकूर सोबत व्यासपीठ शेअर करता,तो मुस्लिम समाजाला शिव्या देत असताना,वादग्रस्त विधान करत असताना त्याला न थांबवता बघ्याची भूमिका घेता, किंबहुना त्याला प्रोत्साहन देता,त्याला घरी घेऊन जाऊन त्याचा सन्मान करता याचा अर्थ ही पूर्ण स्क्रिप्ट संभाजी निलंगेकर पाटील यांची लिखित होती असाच याचा अर्थ निघतो.एवढेच नव्हे तर जयंती कोणतीही असो,या जयंत्या ह्या राजकीय हित समोर ठेवूनच प्रत्येकजण करतो,महापुरुष यांच्याविषयी आदर या गोष्टी फक्त भाषणात बोलायला बऱ्या दिसतात.त्यामुळे ही जयंती देखील ठराविक राजकीय हेतू,उद्देश समोर ठेवूनच केली गेली हे कांही वेगळे सांगायला नको.मग असे असेल व अल्पसंख्याक बहुल लातूर शहरात ज्यावेळी ही स्क्रिप्ट अवलंबली जाते,जो अल्पसंख्याक मतदार येथील काँग्रेसचा व्होट बँक मानला जातो,जो मागील कांही काळात कॉंग्रेसपासून दूर होताना दिसत असताना राजसिंह ठाकूर यांच्या व पर्यायी संभाजी निलंगेकर पाटील यांच्या कृतीमुळे तो अधिक घट्ट झाला, व लातूर शहराचा आमदार जो मराठा समाजातून येतो,ते अमित देशमुख शिवजयंतीला लातूरला न येता राजकीय फायद्यात राहिले,मग याचा अर्थ अमित देशमुखांची सुपारी घेऊन ,सर्वांनी मुस्लिम समाजाला टार्गेट केले असाच याचा एकंदरीत अर्थ निघतो,कारण अद्याप तरी मुस्लिम समाजाच्या मतावर कायम राज्य करणाऱ्या अमित देशमुख यांनी किंवा त्यांच्या काँग्रेस पक्षांनी राजसिंह ठाकूर यांच्यावर कारवाई करा असे कोठेही सांगितले नाही.याचा अर्थ अमित देशमुखांचे देखीक याला मूक समर्थन आहे असा देखील होतो.

लातूर हे शांतताप्रिय शहर आहे,अर्थात त्याला येथील व्यापार, शिक्षण कारणीभूत आहे.त्यामुळे येथील जातीय सलोखा विलक्षण आहे.हिंदू-मुस्लिम दंगल तर खूप दूर,साधे वाद देखील येथे कधी होत नाहीत.एवढेच काय तर अगदी बाबरी मस्जिद ज्यावेळी पाडली गेली त्यावेळी देखील लातुरात परिस्थिती शांत होती,ही लातूरची परंपरा आहे.परंतु मागील कांही काळ पहिला तर महापुरुषांच्या जयंत्या ह्या या परंपरेला कोठे तरी छेद देत आहेत असेच कांहीसे वास्तव चित्र निर्माण झाले आहे.या जयंत्याचा वापर इतर जाती,धर्म यांच्याविषयी द्वेष करण्यासाठी, आपल्या जाती धर्माचे शक्तिप्रदर्शन म्हणून उघड वापरले जात आहेत.त्यातील राजकीय हेतू तर आहेच तो भाग अलाहिदाच.याला कोणताही धर्म अथवा जात अपवाद नाही.कारण नासके कांदे,डोक्यात शेण भरलेले,जातिवाद,घाण ठासून भरलेली प्रत्येक जाती धर्मात आहेत.आपल्या जाती धर्माचा अभिमान कोणालाही असणे हे स्वाभाविक, व तो असलाच पाहिजे ,मात्र तो असताना इतर जाती धर्माचा द्वेष, तिरस्कार हे नक्कीच शोभणीय नाही व ती ज्या महापुरुषांची जयंती साजरी करतो त्यांची शिकवण देखील नाही.त्यातल्या त्यात जे सार्वजनिक किंवा राजकीय जीवनात असतात त्यांना तर हे नक्कीच शोभणीय नाही किंवा त्यांच्याकडून अपेक्षित देखील नाही.किंबहुना किमान उघड कोणाला जाणवेल असे तरी अपेक्षित नाही.कारण लातुरात देखील जे अनेक वर्षे राज्य करतात,त्यांच्या देखील मनात इतर जाती विषयी विशेषतः मुस्लिम व दलितांविषयी फार आस्था आहे असे मुळीच नाही,ते अनेकदा राजकीय पदावर लोक बसवताना स्पष्ट झाले आहे,खाजगीमध्ये बोलताना तर त्यांच्या मनात फार मोठी सल असते जी ते अनेकदा बोलून दाखवतात देखील.मात्र त्याचा परिणाम ते सार्वजनिक किंवा राजकीय आयुष्यावर पडेल असे कृती करत नाहीत.असे असताना मागील कांही काळ पहिला तर जे इतर जाती ,धर्मातील विशेषतः मुस्लिम व दलित समाजातील अनेकजण संभाजी निलंगेकर पाटील यांना जुळत होती,किंबहुना त्यांच्याकडे अपवादात्मक नेता, पर्याय या दृष्टीने पाहत होती,जे लातूरच्या प्रस्थपित नेत्यांसाठी धोक्याची घंटा होती.मात्र शिवजयंती दिनी आमदार राजसिंह ठाकूर याने लातूर शहरात येऊन मुस्लिम समाजाबद्दल विष उगळले,गरळ ओकली त्याने संभाजी निलंगेकर पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या कृतीवर अप्रत्यक्ष पाणी फेरले आहे असा अर्थ काढला तर तो मुळीच चूक ठरता कामा नये.लातुरात असे वादग्रस्त लोक आणायची मुळात गरजच नाही हे समजण्याची गरज प्रत्येकाला आहे, मग तो कोणत्याही जाती धर्मातील असेल.आणि ते देखील शिवजयंतीला हे लातूरच्या संस्कृतीला शोभणीय नाही,व त्यातून इतर समाजाबद्दल द्वेष करून शहरात जातीय तेढ निर्माण करणे हे तर लातूरची परंपराच नाही.त्यामुळे संभाजी निलंगेकर पाटील यांच्याकडून हे अपेक्षित नाही किंवा त्यांना हे शोभणीय नाही असाच अर्थ काढला तर तो चूक होऊ नये.किंबहुना यातून खरी मानसिकता समोर आली का असे देखील कोणी म्हणत असेल तर त्यात चूक ते काय? त्यामुळे मागील काळात इतर समाजाबद्दल जे कांही प्रश्न संभाजी निलंगेकर पाटील यांनी उपस्थित केले ते राजकीय हेतू समोर ठेऊन केले असाच याचा सरळ अर्थ निघतो.निवडणूक काळात किंवा राजकीय सभेला  राजासिंह ठाकूर यांना आणले असते तर त्याला कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नव्हते, मात्र रयतेच्या राजाच्या जयंतीला विषारी लोक आणले जातात याचा अर्थ काय घ्यायचा हा मूळ प्रश्न आहे,ज्याचे उत्तर लातूरच्या जनतेला अपेक्षित आहे.कदाचित हिंदू धर्माचा कैवारी, नेता अशी प्रतिमा संभाजी निलंगेकर पाटील यांना निर्माण करायची असेल,त्यात कोणालाही आक्षेप असण्याचे मुळीच कारण नाही,मात्र त्यासाठी इतर जाती किंवा धर्माचा द्वेष करणेच आवश्यक आहे असे मुळीच नाही.मात्र असे घडलंय हे वास्तव आहे.त्यातून कदाचित हिंदू धर्माचा नेता अशी प्रतिमा संभाजी निलंगेकर पाटील यांची कदाचित होईल देखील,मात्र लातूरमध्ये विष पेरण्याचे काम देखील नक्कीच झाले आहे जे एका राजकीय नेत्याला शोभणीय नक्कीच नाही.कारण ज्या निलंगा मतदारसंघातुन संभाजी निलंगेकर पाटील येतात तेथील मुस्लिम समाजाची संख्या ही दुर्लक्षित करण्यासारखी नाहीये,किंबहुना तेथील समाज देखील संभाजी निलंगेकर पाटील यांना मानतो.असे असताना लातूरसारख्या शांत शहरात विषारी प्रवृत्तीच्या मंडळींना आणायची गरज का भासली हाच अनेकांना मुळात पडलेला प्रश्न आहे.आमदार राजसिंह ठाकुरला कोणत्या नासक्या कांद्यानी आणले ते येथे महत्त्वाचे नाही,मात्र त्याच्यासोबत संभाजी निलंगेकर पाटील यांनी व्यासपीठ शेअर केले,त्याला आपल्या घरी घेऊन जात त्याचा सन्मान केला याचा अर्थ या सर्वांची स्क्रिप्ट ही संभाजी निलंगेकर पाटील यांनीच लिहिली असा सरळ अर्थ होतो.व साहजिक लातुरात त्याच अँगलने प्रत्येकजण याकडे पाहतोय.किंबहुना शिवजयंतीच्या आठ दिवस अगोदर पासून पोलीस प्रशासन फार दबावात होते,अर्थात राजसिंह ठाकूर लातुरात येण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होणारच होता शिवाय लातूरच्या शांत प्रतिमेला धक्का देखील लागणार होता,असे असताना संभाजी निलंगेकर पाटील यांच्या आग्रही भूमिकेमुळेच आमदार राजसिंह ठाकूर लातूरला आला अशी पार्श्वभूमी देखील याला आहे.मग या सर्वांची गरज संभाजी निलंगेकर पाटील यांना का पडली असाच अनेकांना प्रश्न आज पडतोय हे वास्तव आहे,याकडे संभाजी निलंगेकर पाटील यांनी दुर्लक्षित करण्यासारखे नाही.लातूर शहर हे अनेक जाती धर्म असलेला शहर आहे.असे असले तरी अल्पसंख्याक बहुल हे शहर आहे.जो काँग्रेसचा पारंपरिक व्होटबँक मानला जातो.लातुरमध्ये काँग्रेसचा म्हणजे देशमुखांचा.जो मतदार मागील कांही काळात मग तो मुस्लिम असेल किंवा दलित तो दूर जात होता व साहजिक संभाजी निलंगेकर पाटील यांना जुळत होता,मात्र जी घटना शिवजयंतीला घडली,त्याने तो मतदार अधिक घट्ट देशमुखांना झालाय हा ह्या शिवजयंती दिनी घडलेल्या घटनेचा राजकीय अँगल आहे.आणि तो देखील अमित देशमुख लातूरला न येता. म्हणजे बघा शिवाजी महाराज यांची जयंती. लातूर शहराचा आमदार मराठा समाजाचा.आणि तो शिवजयंतीला लातूरला येत नाही याचा अर्थ काय काढायचा तो भाग तर वेगळाच. असे असताना त्याच अमित देशमुखांची राजकीय सोय संभाजी निलंगेकर पाटील यांनी एक प्रकारे आमदार राजसिंह ठाकूर यांना आणत त्यांना मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करायला लावत, गरळ ओकायला लावत केली असे म्हंटले किंवा अर्थ काढला तर त्यात चूक ते काय.कारण तोंडावर असलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शहरात हा मुद्दा उपस्थित केला जाणार किंवा प्रमुख मुद्दा केला जाणार हे कांही वेगळे सांगायला नको, त्यामुळे अमित देशमुखांची सुपारी घेऊन ही सर्व स्क्रिप्ट निर्माण केली असाच याचा अर्थ निघतो.या सर्वातून कोणाचा फायदा झाला, कोण किती विषारी रूपाचे दर्शन दिले,कोणाला आनंद झाला,पडद्याआडून कोण कोण काय भूमिका बजावत होता तो भाग अलाहिदा,मात्र या सर्वांचा सार1जर काढला तर लातूरच्या सुसंस्कृत व शांत शहर या प्रतिमेला संभाजी निलंगेकर पाटील यांनी धक्का देण्याचा किंवा डाग लावण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे जे संभाजी निलंगेकर पाटील यांच्याकडून मुळीच अपेक्षित नव्हते असे म्हणता येईल.


पोलीस अधीक्षकांना जातीय तेढ निर्माण करून जायचे आहे का ?

दरम्यान लातूरला आलेले पोलीस अधीक्षक सोमय मुंडे हे खूप डॅशिंग आहेत,निष्पक्ष आहेत अशी एक प्रतिमा निर्माण करण्यात येत आहे.अर्थात त्यामागे यापूर्वी सोमय मुंडे ज्या गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते, त्याठिकाणी त्यांनी मिलिंद तेलतुंबडे यासह अनेक नक्षलवाद्यांचे एन्काऊंटर केले होते हे कारण आहे.ते कितपत खरे किंवा खोटे, किंवा राजकीय होते,किंवा अन्य काय तो येथे विषय नाहीये.पण आमदार राजसिंह ठाकूर ज्यावेळी लातूरला येणार आहे असे जाहीर झाले,त्यावेळी किंवा त्यावेळीपासून शिवजयंतीच्या दिवसापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी,सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी लातूर हे शांत शहर आहे,येथे जातीय तेढ कधीही निर्माण होत नाही,त्यामुळे आपण या राजसिंह ठाकुरला लातुरात येऊ देऊ नये व अर्थात लातूरची सुव्यवस्था अबाधित राहील असे निर्णय घ्यावे अशी विनंती केली.मात्र तो कांही वादग्रस्त बोलणार नाही अशी हमी यावेळी अनेकांनी दिली,व शेवटी जे अपेक्षित होते तेच झाले.मग सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना जे अपेक्षित होते,अर्थात येथे कोणी काहीही दावा करत असला तरी शहरातील मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठीच कांही नासक्या कांद्यानी आमदार राजसिंह ठाकुरला लातूरला आणले होते हे कांही वेगळे सांगण्याची गरज नाही,व या शिवजयंतीला भाजपची शिवजयंती असेही रूप दिले गेले हे काही वेगळे सांगायला नको.मग सत्ताधारी पक्षाची मंडळी यात गुंतलेली आहेत म्हणून पोलीस अधीक्षक यांनी आमदार राजसिंह ठाकूरला लातूरला येऊ दिले,एवढेच नव्हे तर भाषण करू दिले व वादग्रस्त भाषण केले तरी त्यावर कसलीही कारवाई केली नाही.यावेळी आम्ही नोटीस दिली होती तरी देखील वादग्रस्त भाषण दिले गेले असा दावा केला जातोय,आणि अनेक दिवट्यानी तर कोणी तक्रारच दिली नाही म्हणून राजसिंह ठाकूरवर गुन्हा दाखल झाला नाही असे अकलेचे तारे तोडले.शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे एवढेच काम पोलिसांचे नाहीये तर जातीय तेढ निर्माण होईल अशी घटना घडू नये,किंवा एखादा गुन्हा घडण्याच्या पूर्वी तो कसा घडणार नाही याची काळजी घेणे देखील पोलिसांचे काम आहे,याचा विसरच बहुधा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना राजकारणी मंडळींची मर्जी राखताना पडलेला दिसतोय. कारण लातूरसारख्या शांतताप्रिय शहरात राजसिंह ठाकूर येऊन मिठाचा खडा टाकून जातो तरी देखील पोलीस कसलीही कारवाई करत नाहीत किंबहुना सुओ मोटो गुन्हा दाखल करत नाहीत.शहरात नुकताच एक अल्पवयीन मुलाचा खून झाला त्यात पोलीस सुओ मोटो गुन्हा दखल करते मग येथे तर शहरात दंगल होईल अशीच परिस्थिती राजसिंह ठाकूरने करून दिली,अर्थात शहरातील कांही सर्व समाजातील नासके कांदे,डोक्यात शेण भरलेले लोक सोडले तर बहुतांश लोक हे शांत असल्याने कांही विपरीत घडले नाही.मग ते घडावे याची वाट पाहिली जातेय का हे एकदा पोलीस अधीक्षक यांनी समजण्याची गरज आहे व त्यानुसार कारवाई करण्याची गरज आहे.राजसिंह ठाकूर एक दिवस आला,निघून गेला.पोलीस अधीक्षक शासकीय नियमानुसार राहतील आणि निघून जातील,मात्र भोगायचे आहे सामान्य जनतेला, सामान्य लातूरकरांना.राजसिंह ठाकूर येऊन गेला,त्याच्यावर काहीही कारवाई पोलीस अधीक्षक यांनी अद्याप न केल्याने उद्या आणखीन कोण तरी ,कोणत्या तरी समाजातील डोक्यात शेण भरलेला,जातिवाद ठासून भरलेला नासका कांदा उठेल आणि लातूरला कोणाला तरी घेऊन येईल हे कोठे तरी थांबण्याची,अश्या नासक्या कांद्याना,डोक्यात शेण भरलेल्याना जरब, भीती राहावी अशी कृती ही पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक यांची जबाबदारी आहे.आणि ज्यावेळी ते हे करत नाहीत त्याअर्थी सत्ताधारी मंडळींची मर्जी राखणे महत्त्वाचे आहे,मग भले ही शहरात काहीही होऊ दे,वेगळी प्रथा पडू दे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.आणि ज्यावेळी हे होत नाही त्यावेळी शहरात जातीय तेढ निर्माण व्हावे अशीच इच्छा आहे की काय असा प्रश्न आपोआप निर्माण होतो.


साभार-जावेद शेख-बातमी मागची बातमी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या