पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशाने ट्युशन एरियामध्ये कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन.*


*पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशाने ट्युशन एरियामध्ये कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन.*









लातूर 

दिनांक 09/06/2023 व 19/06/2023 रोजी ट्युशन परिसरात कोम्बिंग ऑपरेशन चे आयोजन. सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मोटर वाहन कायद्यातर्गत 236 केसेस,1,65,350/ रुपये दंड आकरण्यात आला. तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध अधिनियम अंतर्गत  11 गुन्हे दाखल तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कलम 110 /117  प्रमाणे 44 कार्यवाया.


              याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध व महत्त्वाचे असून "लातूर शैक्षणिक पॅटर्न" मुळे संपूर्ण महाराष्ट्र व परराज्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षणासाठी जिल्ह्यात येत असून  शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 

            बाहेरील जिल्ह्यातून व राज्यातून शिक्षणासाठी येणारे बहुसंख्य विद्यार्थी हे अल्पवयीन असल्याने समाजातील काही घटक त्यांना त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गजबजलेल्या ट्युशन एरियातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी,विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच असामाजिक तत्त्वावर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी ट्युशन एरियामध्ये पोलिसांची पायी पेट्रोलिंग, दामिनी पथक, भरोसा सेल मधील महिला पोलीस अधिकारी अंमलदार यांची गस्त , विद्यार्थी, पालक, हॉस्टेल मालक, ट्युशन चालवणारे संचालक यांची वेळोवेळी बैठक घेऊन मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून  ट्युशन एरियात विनाकारण वाहनावर फिरणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यासंदर्भात आदेशित केले होते.

                त्या अनुषंगाने दिनांक 09/06/2023 व 19/06/2023 रोजी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी,(लातूर शहर) श्री.भागवत फुंदे यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील पोलीस अधिकारी अमलदार, शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार, उपविभागीय कार्यालयाचे विशेष पथक तसेच लातूर शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे गुन्हे अन्वेषण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे विशेष कार्यवाही पथक बनवून त्यांना मार्गदर्शन करून अचानकपणे कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते.

                सदर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान  ट्युशन एरियात विनाकारण रेंगाळणाऱ्या व वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असताना मिळून आलेल्या एकूण  236 वाहन चालकावर मोटार वाहन कायद्या अन्वये कार्यवाही करून त्यांना 01लाख 65 हजार 350 रुपयाचा दंड आकारण्यात आला.

         ट्युशन एरिया मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला सुगंधित व तंबाखूजन्य पान मसालाची चोरटी विक्री व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करत एकूण 11 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पान मसाला जप्त करण्यात आलेला आहे.

             तसेच ट्युशन रस्त्यावर जाणून सामाजिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने असभ्य वर्तन करणारे व विनाकारण फिरणाऱ्या एकूण 44 तरुणावर मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 110/117 प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे.

                  एकंदरीत ट्युशन एरिया मध्ये शिकवणीसाठी स्थानिक व बाहेरचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असल्याने व तेथे सतत वर्दळ असल्याने सदर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. याकरिता लातूर पोलिसांकडून सदर परिसरात वेळोवेळी अचानकपणे  कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करून समाजविघातक प्रवृत्तीवर कार्यवाही करण्यात येत आहे.

          वरिष्ठांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.भागवत फुंदे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सायक पोलीस निरीक्षक विशाल शहाणे,वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, पोलीस उपनिरीक्षक अवेज काझी, आयुब शेख तसेच लातूर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अधिकारी/अमलदार यांनी कोंबिंग ऑपरेशन राबविले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या