*बनावट आधार कार्डच्या माध्यमातून 50 च्या वर सिमकार्ड विकणाऱ्या व्यावसायिकांवर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूरच्या दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई. उदगीर येथील एक जण ताब्यात.
लातूर
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र सायबर कार्यालय मुंबई यांनी बनावट सिमकार्ड विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर कार्यवाही करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन कळविले होते.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले वरून दहशतवाद विरोधी शाखा, लातूर यांनी उदगीर येथे कार्यवाही करत एकास ताब्यात घेतले असून त्याने एकूण 48 सिम कार्ड बनावट कागदपत्राचे आधारे ऍक्टिव्हेट करून इतरांना वापरण्यास दिल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले आहे.
सदर संशयित आरोपीचे नाव
1)शिवकुमार महादेव आंबेसंगे, वय 27 वर्ष, राहणार आंबेसंगे गल्ली, चौबारा रोड, उदगीर सध्या राहणार विजय कॉलनी, शिवाजी विद्यालय जवळील एका अपार्टमेंट मध्ये.
असे असून सदर सिमकार्ड विक्रेत्यांकडून ग्राहकाने दिलेले आधारकार्ड आणि फोटोचा गैरवापर करत एकाच नावाने अनेक सिमकार्ड नोंदवल्याचा प्रकार उघड झाला आहे.
नमूद संशयित आरोपीने सन 2017 मध्ये उदगीर नगरपरिषद कॉम्प्लेक्स येथे "व्हीआयपी कम्युनिकेशन" नावाचे दुकान सुरू केले होते. त्यादरम्यान
मोबाईल टेलिकॉम कंपन्यांचे सिमकार्ड जास्तीत जास्त विक्री व्हावी यासाठी ग्राहकांना अनेक प्रलोभने दिली यातून सदर विक्रेत्यांने ग्राहकांकडून मिळालेला आधारकार्ड आणि फोटोंचा गैरवापर करत एकाच्याच नावे अनेक सिमकार्डची विक्री दाखवत कंपन्यांची फसवणूक केली. शिवाय बनावट कागदपत्राने ऍक्टिव्हेट केलेले सिमकार्ड अनोळखी व्यक्तींना ज्यादा पैशात विक्री करुन त्याचा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये गैरवापर होऊ शकतो याची जाणीव असताना सुद्धा असे सिमकार्ड विक्री करून कंपनीचे आर्थिक नुकसान व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने दहशतवाद विरोधी शाखा, लातूर येथील पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या फिर्याद वरून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2023 कलम 420, 465, 468, 471 भारतीय दंड विधान व 66 (क) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद संशयित आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सदर गुन्ह्यात केवळ कंपन्यांच्या फसवणुकीपुरता राहिला आहे, की यातून अन्यही काही गैरप्रकार केले गेले आहेत याबाबत व इतर बाबींचा सखोल तपास उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, सहायक फौजदार उत्तम जाधव, अंगद कोतवाड, पोलीस अमलदार युसुफ शेख, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुंडे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.