भरोसा सेल, सायबर सेल व दामिनी पथक यांचे वतीने ट्युशन क्लासेसच्या हजारो विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, सोशल मीडिया, सायबर क्राईम व डायल 112 यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
लातूर रिपोर्टर
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, भरोसा सेल, सायबर सेल व दामिनी पथक यांचे वतीने दिनांक 31 ऑगस्ट रोजी आय आय बी व विद्या आराधना या दोन्ही ट्युशन क्लासेस मध्ये हजारो विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, सोशल मीडिया, सायबर क्राईम व डायल 112 यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
लातूर शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत प्रसिद्ध व महत्त्वाचे असून "लातूर शैक्षणिक पॅटर्न" मुळे संपूर्ण महाराष्ट्र व परराज्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षणासाठी जिल्ह्यात येत असून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
बाहेरील जिल्ह्यातून व राज्यातून शिक्षणासाठी येणारे बहुसंख्य विद्यार्थी हे अल्पवयीन असल्याने समाजातील काही घटक त्यांना त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गजबजलेल्या ट्युशन एरियातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी,विद्यार्थ्यांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच असामाजिक तत्त्वावर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी ट्युशन एरियामध्ये पोलिसांची पायी पेट्रोलिंग, दामिनी पथक, भरोसा सेल मधील महिला पोलीस अधिकारी अंमलदार यांची गस्त , विद्यार्थी, पालक, हॉस्टेल मालक, ट्युशन चालवणारे संचालक यांची वेळोवेळी बैठक घेऊन मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून ट्युशन एरियात विनाकारण वाहनावर फिरणाऱ्या लोकांवर कार्यवाही करण्यासंदर्भात आदेशित केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायबर सेल व दामिनी पथक यांचे वतीने आय आय बी व विद्या आराधना या दोन्ही ट्युशन क्लासेस मध्ये पोक्सो कायदा, सोशल मीडिया, सायबर क्राईम व डायल 112 यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर मार्गदर्शना करिता सायबर एक्सपर्ट श्री मुकेश भांदरगे, पुणे हे उपस्थित होते. सोशल मीडियाच्या अतिवापराकडे तरुणाईचा वाढता कल पाहता तरुणांना यापासून उद्भवणाऱ्या धोक्यांना प्रतिबंधित करण्यासाठी त्यांना त्यासंबंधी अवेअर करणे गरजेचे आहे. त्याकरिता लातूर जिल्हा पोलीस दलातील भरोसा सेल, सायबर सेल व दामिनी पथक यांच्या वतीने सदर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना सायबर एक्सपर्ट श्री. मुकेश भांदरगे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे असणारे धोके कसे टाळावेत. तसेच सायबर क्राईम, ऑनलाइन फ्रॉड यासंबंधी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तर भरोसा सेल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक, दयानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा, डायल 112, पोलीस सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल यासंबंधीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
लातूर शहरांमध्ये ट्युशन परिसरात जवळपास 30 ते 40 हजार विद्यार्थी क्लासेस करिता वास्तव्यास आहेत. अशावेळी टवाळखोर मुले किंवा समाजकंटक यांचे कडून मुला-मुलींना होणारा त्रास टाळण्यासाठी व त्यांना तात्काळ पोलीस मदत कशा पद्धतीने उपलब्ध होईल यासाठी विद्यार्थ्यांना काही हेल्पलाइन संबंधी माहिती देण्यात आली. तसेच हेल्पलाइन नंबर असलेले पोस्टर्स चे विद्यार्थ्यांच्या हस्ते अनावरण करून ते क्लासेस परिसरात लावण्यात आले आहेत. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आय.आय.बी. क्लासेसचे संचालक श्री. चिराग सर तसेच विद्या आराधना क्लासेसचे संचालक श्री. संजय लड्डा सर यांनी मदत केली.
एकंदरीत ट्युशन एरिया मध्ये शिकवणीसाठी स्थानिक व बाहेरचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असल्याने व तेथे सतत वर्दळ असल्याने सदर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी. याकरिता लातूर पोलिसांकडून सदर परिसरात वेळोवेळी अचानकपणे कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करून समाजविघातक प्रवृत्तीवर कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरचा कार्यक्रम दोन्ही क्लासेस मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या मार्गदर्शनाचा दोन्ही क्लासेसचे मिळून जवळपास सहा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी दोन्ही क्लासेसचे शिक्षक, भरोसा सेल व दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदार हजर होत्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.