औसा बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा चंद्रशेखर सोनवणे यांचे आवाहन
औसा प्रतिनिधी राम कांबळे
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादित झालेला शेतमाल महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ व औसा कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा संयुक्त विद्यमाने शेतमाल तारण योजनेअंतर्गत ठेवून शेतकऱ्यांना केवळ 6 टक्के व्याजदराने चालू शेतमालाच्या किमतीत 75 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती चंद्रशेखर सोनवणे यांनी केले. औसा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपसभापती भीमाशंकर राचट्टे ,संचालक धनराज जाधव पुरुषोत्तम, झिरमिरे अशोक वीर, सचिव संतोष हुच्चे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना चंद्रशेखर सोनवणे म्हणाले की आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत रस्त्यासाठी व शौचालय बांधकामासाठी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. किल्लारी येथील बाजार समिती विकसित करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला असून दोन एकर उपलब्ध जागेमध्ये आगामी काळात किल्लारी तालुका होणार हे लक्षात घेऊन त्या धर्तीवर किल्लारी बाजारपेठेचा विकास करण्यात येणार आहे. तसेच उजनी येथील उपबाजारपेठेच्याही विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला लातूरच्या बाजार समितीच्या बरोबरीने भाव देण्याचा प्रमाणिक प्रयत्न कृषी उत्पन्न बाजार समिती औसा च्या माध्यमातून केला जात असून व्यापारी व शेतकऱ्यांच्या मदतीने येणाऱ्या काळात निश्चितच बाजार समितीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यावेळी बोलताना प्रा. राचट्टे म्हणाले की औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार पारदर्शक व सीसीटीव्ही कॅमेरा व संगणक प्रणाली द्वारे विकसित होणार असून शेतमाल तारण योजनेअंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केलेला सातबारा आठ अ, आधार कार्ड व बँक पासबुक च्या माध्यमातून नोंदणी करून शेतमाल तारण योजनेतून कौटुंबिक आर्थिक अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले. या पत्रकार परिषदेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे इतर संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.