*पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर*
*प्रेस नोट*
*"एक धाव व्यसनमुक्तीसाठी" मॅरेथॉन स्पर्धेची लातूर पोलिसांकडून जय्यत तयारी. विविध इव्हेंट, पोस्टर, व्हिडिओ मुलाखतीच्या साह्याने मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याचे लातूर पोलिसांकडून आवाहन*
लातूर (प्रतिनिधी )तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी किंवा चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यांना वेळीच थांबवणे काळाची गरज आहे. होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य तर अंधारात ढकलतातच आणि त्याबरोबर एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्नदेखील विरून जाते.
हीच सामाजिक बांधिलकी जपत लातूर पोलीस दलाच्या वतीने,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून अमली पदार्थ वापराविरोधी जनजागृती व्हावी, पालकांचे याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी "एक धाव व्यसनमुक्तीसाठी" या शीर्षकाखाली 03 डिसेंबर 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेमधून जास्तीत जास्त नागरिका पर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवणे हाच लातूर पोलिसांचा उद्देश असून सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन सदर मॅरेथॉन सफल करणे बाबत राजकीय व सामाजिक तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे प्रतिष्ठित नागरिकांनी सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होणे बाबत आवाहन करण्यात आले असून तसे व्हिडिओ क्लिप्स व पोस्टर मोठ्या प्रमाणात लातूर पोलिसांकडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहेत.
मॅरेथॉन पोस्टर्स लावलेले मॅरेथॉन रथाच्या माध्यमातून विविध शाळांना भेटी देऊन जनजागृती करून रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 26 रोजी मॅरेथॉन जनजागृतीसाठी पोलीस बँड च्या उपस्थितीत प्रमोशनल रन घेण्यात आले. या रन मध्ये 100 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला.
*मुलांना व्यसन कसे जडते*?आजूबाजूचे वातावरण, घरातील एखाद्या व्यक्तीला बघून, मित्रांबरोबर केवळ मजा करण्यासाठी, एकदा अनुभव घेऊन बघू असा विचार करून, कुतूहल म्हणून अशी एक ना अनेक कारणं व्यसन जडण्यापाठीमागे असू शकतात. पालक म्हणून आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवे. मुलांमध्ये व्यसनांची सुरुवात साधारणत: पौगंडावस्थेतच होते. त्याचवेळी त्याला व्यसनाच्या बाबतीत अटकाव झाला तर मग तो भविष्यात शक्यतो कोणत्याही व्यसनाच्या आहारी जात नाही. देशातील एकूण् कर्करोगाच्या प्रमाणापैकी ३४% कर्करोग तंबाखूमुळे होतात. चोऱ्या, दरोडे आणि बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे नशेच्या अधीन गेल्यामुळे होतात.घरगुती हिंसाचाराचे प्रमुख कारण व्यसन आहे. रस्त्यांवर होणारे अनेक अपघात व्यसनाधीन असल्यानेच होतात. धूम्रपान केल्याने हृदयरोग, कॅन्सर आणि फुफ्फुसांचे आजार अशा गंभीर समस्या उद्भवतात.
हे सर्व टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक असून लातूर पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "एक धाव व्यसनमुक्तीसाठी" मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन व्यसनमुक्तीचा संदेश सर्वापर्यंत पोहोचवावा असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी केले आहे.
सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लातूर पोलिसाच्या वतीने गुगल फॉर्म ची लिंक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली असून सदर फॉर्म भरून मॅरेथॉन मध्ये विनाशुल्क सहभागी होता येणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.