*वाढदिवस एक वाढता सामाजिक आजार*
🪶 एम आय शेख
*"वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये महेरम आणि गैरमहेरम असे अनेक लोक आमंत्रित असतात. स्वतःला पुरोगामी सिद्ध करण्यासाठी अशा कार्यक्रमांमध्ये यजमान आणि आमंत्रित यांच्या महिला आणि पुरूष मोठ्या प्रमाणात एकत्र जमा होतात. नटून थटून असतात. फेस्टीव्ह मूडमध्ये असतात. अंतःकरण उदार असते. एकमेकांचे अभिनंदन करतात. उत्साहात आलिंगन देतात...! खराबी की शुरूवात यहीं से होती है."*
*▪️24 नोव्हेंबर 2023 रोजी पुण्यामध्ये रेणुका (वय 38) हिने तिचे पती निखिल खन्ना (वय 36) यांच्या नाकावर एवढा जबरदस्त ठोसा मारला की त्यांचे नाक तुटले व श्वास नलिकेत रक्त साकाळल्याने त्यांचा मृत्यू झाला. कारण होते रेणुकाला आपला वाढदिवस दुबईला साजरा करावयाचा होता. निखिल खन्नाने तिची ही इच्छा पूर्ण केली नाही. याशिवाय, रेणुका निखिलवर यासाठीही नाराज होती की लग्नाच्या वाढदिवसाला त्याने तिच्या मनाप्रमाणे तिला भेटवस्तू घेवून दिली नव्हती. वाढदिवस आणि इतर दिवस साजरे करण्याचे फॅड भारतीय समाजामध्ये इतके भिनले आहे की, ते आजमितीला एक सामाजिक आजार बणून गेले आहेत. वाचकांना वाटेल की एका घटनेवरून लेखक हा निर्णय कसा घेऊ शकतो. तर ही घटना अपवादात्मक नाही यापूर्वीसुद्धा एका व्यावसायिकाच्या मुलीने वडिलांनी (व्यवसाय तोट्यात आल्या मुळे) वाढदिवस नेहमीप्रमाणे थाटामाटात साजरा न केल्याने आत्महत्या केली होती. वाढदिवसांचे रूसवे फुगवे आता नित्याचीच बाब झाली आहे. यूरोप व अमेरिकेत तर नवऱ्याने बायकोच्या वाढदिवसाची तिथी लक्षात ठेवली नाही म्हणून अनेकांची घटस्फोटं सुद्धा झालेली आहेत. लवकरच हे प्रकार भारतात ही सुरू होतील यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.*
*▪️ जेव्हा समाजामध्ये एखादी वाईट गोष्ट रूढ होते तेव्हा काही दिवसानंतर ती गोष्ट अनिवार्य होऊन जाते. अरबी भाषे मध्ये याला 'अल-मारूफ़ वल-मशरूत' असे म्हंटले जाते ''अल- मारूफ़ चा अर्थ प्रसिद्ध होणे तर वल मशरूतचा अर्थ अनिवार्य होणे असा आहे. पश्चिमेकडून आलेली वाढदिवस साजरा करण्याची परंपरा भारतात एव्हाना रूढ झालेली आहे. आश्चर्य तर या गोष्टीचे आहे की, अहले शरियत (शरियतला मानणारे) मुसलमान सुद्धा या आजराच्या विळख्यात असे अडकलेले आहेत की, आपल्या कष्टाच्या कमाईचा एक मोठा भाग ते या दिवसा साठी लागणारे हानिकारक केक, मेनबत्या आणि इतर फालतू साहित्य खरेदी करण्यामध्ये वाया घालवत आहेत. मुस्लिमांमध्ये वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याची सुरूवात लहान मुलांच्या वाढदिवसाने होते. मग हळूहळू मोठ्यांचेही वाढदिवस साजरे केले जातात. लग्नाचे वाढदिवस सुद्धा साजरे करण्याचे प्रमाण अलिकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यात पाकिस्तानी सिरीयलस चा ही मोठा सहभाग आहे. वाढदिवस साजरे करण्याचा इस्लामशी काही संबंध नाही. परंतु कुरआनशी प्रत्यक्ष संबंध तुटल्यामुळे ह्या प्रकारची थेरं मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत.*
*▪️ वाढदिवस साजरा करण्याला इस्लामी संस्कृती प्रमाणेच हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा स्थान नाही. उलट हे या संस्कृतीच्या विरूद्ध आहेत. कोणताही शुभप्रसंग दीपप्रज्वलन करून साजरा करणारा हिंदू समाज आज आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी मेनबत्या विझवून तो साजरा करत आहे. याला काय म्हणावं? मला तर याच गोष्टीचे नवलच वाटते. खरे तर या दोन्ही समाजातील संस्कृती रक्षकांनी एकत्र येऊन या विदेशी रितीविरूद्ध एल्गार पुकारण्याची गरज होती. परंतु सध्याच्या सांप्रदायिक वातावरणात हे शक्य नसल्याने किमान मुस्लिमांनी तरी आपले शरई कर्तव्य म्हणून व्हॅलेंटाईन डे, बर्थ डे, अॅनिव्हर्सरी आणि थर्टीअर्स्ट सारखे दिवस साजरे करू नयेत व सनदशीर मार्गाने जमेल तितका विरोध करावा.*
*मुस्लिमांची_जबाबदारी*
*सुरे बकरामध्ये अल्लाहने फर्माविले आहे की,*
*1.’लोक हो! जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा आणि सैतानाच्या मार्गाचे अनुसरण करू नका. निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे. कारण तो तुम्हाला वाईट आणि अश्लिल गोष्टींचा आदेश देत असतो. जेणेकरून तुम्ही अल्लाहविषयी त्या गोष्टी बोला ज्या तुम्ही जाणत नाहीत.’*
*(सुरे बकरा आयत नं. 168-169)*
*2. ’ व्याभिचाराच्या जवळपासही फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग’*
*(सुरे बनी इसराईल आयत नं. 32)*
*▪️बर्थ डे असो का अन्य डेज, पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये महिलांना त्यांच्या गृहिणीपदाच्या मूळ जबाबदारीपासून विलग करून पुरूषांबरोबर कामाला जुंपन्यामागे मूळ हेतू त्यांचे लैंगिक शोषण करणे हा असतो. साधारणपणे मुक्त वातावरणात स्त्री-पुरूष काम करत असतील तर त्यांच्यात एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होणे ही नैसर्गिक बाब आहे व त्यातूनच गुंतागुंतीचे नातेसंबंध तयार होत असतात. वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये महेरम आणि गैरमहेरम असे अनेक स्त्री-पुरूष आमंत्रित असतात. स्वतःला पुरोगामी सिद्ध करण्यासाठी अशा कार्यक्रमांमध्ये यजमान आणि आमंत्रित यांच्या महिला आणि पुरूष मोठ्या प्रमाणात एकत्र जमा होतात. नटून थटून असतात. फेस्टीव्ह मूडमध्ये असतात. अंतःकरण उदार असते. एकमेकांचे अभिनंदन करतात. उत्साहात आलिंगन देतात. खराबी की शुरूवात यहीं से होती है. कोणाच्या लक्षातही येत नाही की कोणत्या स्त्री पुरूषाच्या मनामध्ये गैरमहेरम विषयी आकर्षणाची ठिणगी कधी पडली. वाढदिवस किंवा अॅनिव्हर्सरी साजरीच केली गेली नाही तर ही जोखीमच शिल्लक राहत नाही. वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरीच्या सोहळ्यांमधून अनेक अनैतिक नाती जुळत असतात आणि अशाच दुसर्या कार्यक्रमांमधून ही नाती फुलत जातात. ज्यामुळे आपल्या वैध जोडीदारापासून ही नाते लपविण्यामध्ये दमछाक होते. सध्या समाजामध्ये तणावाचे सर्वात मोठे कारण हेच आहे. यातून काही जोडपी वेळीच सावधान होवून स्वतःला सावरून आपल्या संसारात रममाण होतात. मात्र सगळेच असे नशीबवान नसतात. बहुतेक लोक अनैतिक नात्यात वाहत जावून एक तर आत्महत्या करतात किंवा त्यांच्यापैकी एकाचा खून तरी होतो. निखिल आणि रेणुकाच्या नात्याचेच पाह ना. वाढदिवस तर राहिला बाजूलाच निखिल जीवानिशी गेला आणि रेणुका तुरूंगात गेली. मुलं वार्यावर आणि वृद्ध आईवडिलांच्या जीवाला कायमचा घोर.*
*▪️मुस्लिम समाजामध्ये ज्या मुस्लिमांचा कुरआनशी प्रत्यक्षात संपर्क तुटलेला आहे, त्यांच्यात आणि वरील प्रमाणे मुक्त वातावरणात राहणार्या इच्छा-आकांक्षांच्या गुलामात कोणतेही अंतर नाही. म्हणून असे मुस्लिम सुद्धा सतत मुक्त लैंगिक संबंधाच्या शोधात असतात. स्त्री त्यांच्यासाठी एक सेक्स ऑब्जेक्ट असते. व्हॅलेंटाईन डेज, फ्रेंडशीप डेज वगैरे हे जे सारे डेज आहेत, त्यात अनोळखी स्त्री-पुरूष भेटी व त्यातून मुक्त संबंध निर्माण होण्याची संधी दडलेली असते. याच संधीच्या शोधात हे लबाड पुरूष असतात. म्हणून अशा अभिरूचीचे लोक मोठ्या प्रमाणात असे डेज साजरे करण्यात उत्सुक असतात व दुसर्यांना त्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यात शेवटी बळी जातो तो निरागस उमलू पाहणार्या मुलींचा. या डेज आणि डेटींगच्या नावाखाली त्यांना भुलवून त्यांचे लैंगिक शोषण करण्याच्या तयारीत असणार्या या लांडग्यांच्या भूल थापांना त्या अन-अनुभवी असल्यामुळे बळी पडतात. त्यातूनच मग अनेक मुलींचे जीवन उध्वस्त होते. तर काहींना आत्महत्या सुद्धा कराव्या लागतात.*
*▪️अशा प्रकारच्या लांडग्यांची लबाडी उघडी पाडून आपल्या व आपल्या देशबांधवांच्या निरागस मुला-मुलींना या डेज पासून सावध करणे भारतीय मुस्लिम म्हणून आपली जबाबदारी आहे. या संबंधीचे जमेल त्या पद्धतीने, जनजागरण करत राहणे व मुला-मुलींना यातील धोक्यासंबंधी सावधानतेचे इशारे देत राहणे; तूर्तास एवढेच आपल्या हाती आहे. तेवढेच आपण करावे.*
*▪️इस्लामी शरियतवर आधारित जीवनशैली चमकदार जरी नसली तरी शीतल अल्लाहददायक आणि तणावमुक्त जीवनशैली आहे. यात कुठलेही डेज साजरे करण्याला काडीचे स्थान नाही. डेज साजरे केल्यामुळे निखिल-रेणुका प्रकरणाप्रमाणे अनेक गुन्ह्याची प्रकरणे घडत असल्याच्या बातम्या मुस्लिम समाज रोज वाचतो. परंतु त्यापासून बोध घेत नाही. अशा लोकांच्या बाबतीत कुरआमध्ये म्हटलेले आहे की, ”आता काय हे लोक याशिवाय इतर एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहे की तो शेवट समोर यावा ज्याची चेतावणी हा ग्रंथ देत आहे”*
*(कुरआन सुरे अलआराफ आयत नं. 53)*
*▪️या आयातीच्या स्पष्टीकरणात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त इस्लामिक विद्वान मौलाना अबुल आला मौदूदी म्हणतात की, ”ज्या व्यक्तीला खर्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाहीत. मग त्याच्या समोर काही लोक खर्या मार्गावर चालून दाखवून सुद्धा देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां, हा मार्ग चुकीचा होता. तसेच जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर याचा अर्थ असा की ती व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती.*
*(संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35)*
*▪️एकंदरित वाढदिवस आणि इतर 'डेज' साजरे न करणे एवढेच मुस्लिमांचे कर्तव्य नाही तर प्रादेशिक भाषांमधून आपल्या देशबांधवांना सुद्धा या डेजच्या मायावी जाळ्यात अडकण्यापासून सावधान करणे हे सुद्धा कर्तव्य आहे.*
*🤲 शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ” हे अल्लाह! आम्हाला अशा प्रकारचे 'डेज' साजरे करण्या पासून दूर राहण्याचे धाडस आणि आपल्या देशबांधवांना या नुकसानीतून वाचविण्याची शक्ती दे.” आमीन.*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.