*बेपत्ता अल्पवयीन मुलींचा 24 तासात शोध. पोलीस ठाणे औराद ची कारवाई.*
"रागाच्या भरात घर सोडून निघून गेलेल्या" बेपत्ता अल्पवयीन मुलींचा 24 तासात शोध घेऊन त्यांच्या पालकाचे स्वाधीन..
लातूर (प्रतिनिधी )याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस ठाणे औराद शहाजानी हद्दीत दिनांक 30/01/2024 रोजी दोन अल्पवयीन सख्या बहिणी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती.
अल्पवयीन मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादवरून पोलीस ठाणे येथे औराद शहाजनी येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, निलंगा डॉ.नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनात औराद शहाजानी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे औरद (श.) चे पथक तयार करून बेपत्ता मुलींचा शोध घेण्यास रवाना करण्यात आले.
वेगवेगळ्या पथकामार्फत बेपत्ता मुलींचा शोध घेत असताना मुलींच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे संपर्क साधून सखोल विचारपूस करून माहिती मिळविण्यात येत होती. दरम्यान बेपत्ता झालेली मुलगी एका मैत्रिणीला इंस्टाग्राम वर कॉल करत असल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर सेल शी संपर्क साधून मुलीचा ठाव ठिकाणा माहिती करून घेत असताना सदरची बेपत्ता मुलगी बोलत असताना पाठीमागे बसेसच्या अलाउसिंग ची घोषणा ऐकू येत असल्याने सदरच्या मुली या कोणत्यातरी बस स्थानकावरून कोठेतरी प्रवास करणार असल्याची खात्री झाली. त्यावरून तात्काळ नांदेड, लातूर, धाराशिव, उदगीर, निलंगा अशा व इतर बस स्थानकावर कार्यरत असलेल्या पोलिसांना माहिती देऊन मुलींचे फोटो व्हाट्सअप वर कर्तव्यावरील पोलिसांना पाठविण्यात आले.
थोड्याच वेळात सदरच्या मुली ह्या लातूर येथील बस स्थानकावर असल्याचे कर्तव्यावरील पोलिस अमलदाराच्या निदर्शनास आले. त्यावरून महिला पोलिसांच्या मार्फतीने दोन्ही अल्पवयीन पीडित मुलींना पोलीस ठाणे गांधी चौक येथे आणून औरद शहाजानी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदर अल्पवयीन मुलींकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, आम्हाला आमच्या आई वडील हे नेहमी अभ्यास करा म्हणून तगादा लावत असल्याने आम्ही दोघी बहिणी रागाच्या भरात घर सोडून कोणालाही न सांगता निघून गेल्या होत्या असे सांगितले.
औराद शहाजानी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अतिशय तत्परतेने कारवाई करत "रागाच्या भरात घर सोडून निघून गेलेल्या" बेपत्ता अल्पवयीन मुलींचा 24 तासात शोध घेऊन त्यांच्या पालकाचे स्वाधीन केले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औराद शहाजानी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दूर पडे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे पोलीस अंमलदार श्रीनिवास चिटबोने, हारणे,मनोज मोरे, विश्वनाथ डोंगरे, पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस अमलदार कत्ते तसेच सायबर सेलचे गणेश साठे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.