सेवा है यज्ञकुंड.....
स्वातंत्र्यपूर्व काळात, शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार असून, शिक्षणात प्रगती करून सुशिक्षित समाज निर्माण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे हा विचार प्रत्यक्षात जगत सेठ पुरणमलजी लाहोटी यांनी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे सन १९४० मध्ये बीजारोपण केले.
जागतिक, राष्ट्रीय पातळीवरील एकानेक महत्वाच्या उपलब्धीसह आज ९ शैक्षणिक संकुलांतून तब्बल १०००० विद्यार्थी प्रतिवर्षी या संस्थेतून शिक्षण घेत शिक्षणाच्या लातूर पॅटर्नला आपल्या कामगिरितून देशभरात तेज प्राप्त करून दिले आहे.
संस्थेचे माननीय विश्वस्त - संचालक मंडळ, विद्यार्थी यांसह कर्मठ शिक्षक - कर्मचारी परिवार यांच्या एकत्र परिश्रमातून यशाच्या शिखरावर आज संस्था अभिमानाने विराजमान आहे.
संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत संस्थेच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक घटकांसाठी मग ते सर्व माननीय संस्थाचालक असोत की शिक्षक - कर्मचारी असोत किंवा पालक - विद्यार्थी असोत सर्वांसाठी आदराचे स्थान असलेले, असे संस्थेच्या इतिहासातील एक सुवर्णपृष्ठ म्हणून जर काहीएक उल्लेख करावयाचा असेल तर नक्कीच ते नाव येते श्री विनायकराव माचीले गुरुजी - अण्णा!
विहित वयोमानानुसार १९८३ साली सेवानिवृत्ती नंतर सन २०१७ पर्यंत पुन्हा अथक, निर्विकार, आणि अगदी समर्पित असे ३४ वर्षे सेवा देणारे उच्चकोटीचे सेवाव्रती आदरणीय माचिले गुरुजी हे शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वार्थाने आदर्श आहेत, दीपस्तंभ आहेत.
कार्यामग्नता हे जीवन व्हावे आणि मृत्य हीच विश्रांती या उक्तीस सार्थ करत आदरणीय गुरुजी ९७ व्या वर्षी श्री प्रभू चरणी लीन झाल्याचे वृत्त मनाला तीव्र वेदना देणारे आहे. माझ्या रूपाने चौथ्या पिढीला मार्गदर्शन देणारे गुरुजी हे शिक्षण क्षेत्रातील एकमेवाद्वितीयच आहेत.
२०११ ते २०१७ या दरम्यान ६ वर्षांचा काळातील त्यांचा सहवास माझ्या जीवनात अतिशय प्रेरणादायी आहे. कार्यतत्परता, समर्पण, प्रामाणिकता व सदैव सेवाभाव हे गुणविशेष आपल्या प्रत्यक्ष जीवनातून जगण्याचा संदेश देत संस्थापक अध्यक्ष, शिक्षण महर्षी सेठ पुरणमलजी लाहोटी यांच्या विचारांना माझ्या सारख्या असंख्य मनात अखंड तेवत ठेवणारे गुरुजी कार्यरुपाने सदैव अमर आहेत.
श्री रमण दादा, श्री सुधाकर नाना व आता श्री गुरुजी हा माचिले कुटुंबावर झालेला नियतीचा हा आघात क्लेशदायक आहे. परम कृपाळू श्री प्रभू माचिले परिवारास या दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य प्रदान करो, ही प्रार्थना. ओम शांती
वयाची तब्बल ८० वर्षे अखंड सेवा देणारे समर्पित गुरुजी हे लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील भीष्म पितामह आहेत. गुरुजींच्या स्मृतीस कोटी कोटी नमन!
प्रवीण शिवनगीकर, लातूर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.