सायकलवरून भारत भ्रमण करणाऱ्या संतोष बालगीरचा रॅली काढून लातुरात सन्मान
लातूर / प्रतिनिधी : एक ध्येय वेडा, जागतिक वारसा स्थळाचे संरक्षण व संवर्धन तसेच भारतीय जवानांच्या सन्मानार्थ १८२ दिवसांत १२ हजार २०० कि.मी.प्रवास सायकलवरून भारत भ्रमण करून लातुरात पोहचलेले वासनगावचे सुपुत्र सायकलीस्ट क्लबचे सदस्य संतोष बालगीर या युवकाचे क्लबच्या वतीने रेणापूर ते लातूर सायकल रॅली तसेच वृक्षारोपण करून स्वागत करण्यात आले.
१८२ दिवसांपूर्वी आपले ध्येय गाठण्यासाठी निघालेले संतोष प्रकाश बालगीर याचे रविवार २० रोजी लातुरात आगमन झाले. १२ हजार २०० किलोमीटरचा प्रवास करताना हिमालयाच्या उत्तुंग बर्फाच्छादित शिखरातून, सह्याद्रीच्या कुशीतून, कन्याकुमारीपर्यंत घनदाट अरण्यातून सर्व महानद्या, डोंगर,दरी, कडे, कपार पार करत व कोरोनाच्या सावटातुन "संजीवनी सफर~ Ride Across India" हा सायकल प्रवास केल्यानंतर या तरूणाचे रविवारी लातूरमध्ये आगमन झाले. मूळचे वासनगाव ता. लातूर येथील रहिवासी असलेल्या संतोषने गेली सहा महिने अत्यंत खडतर अशा प्रवासाचा सामना करीत त्यानी स्वप्न पूर्ण केले. रविवारी सकाळी रेणापूर येथे वृक्षारोपण करून लातूर सायकलिस्ट क्लबतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. पहाटे ६ वाजता श्रीकांत वाघमारे, रमेश कटके, अप्पूशेठ देवमानकर, चि.आरुष औसेकर या सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेणापूरच्या बाजार मैदानात ४ झाडे लावून लातूर सायकलीस्ट क्लबने संतोष बालगीर यांच्या स्वागतासाठी खास रेणापूर ते लातूर ढोल ताशाच्या गजरात १०० सायकल स्वारांसोबत मिरवणूक काढण्यात आली. शहरातील अहिल्याबाई होळकर चौक याठिकाणी बालगीर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन आंबेडकर पार्क या ठिकाणी वडाचे झाड लावून संपुण बालगीर परीवाराचा सत्कार केला.
याप्रसंगी महापौर विक्रांत गोजमगुंडे , नगरसेवक शैलेश गोजमगुंडे, इंजिनीयर असोसिएशन लातूरचे अध्यक्ष अभिजित देशपांडे सरसंबेकर , लातूर सायकलीस्ट क्लबचे अध्यक्ष सतीश खोबरे, सचिव गंगाधर बिरादार, सुपर्ण जगताप यांच्यासह शहरातील क्रीडाप्रेमी तरुण-तरुणी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या संतोषचे भरभरून कौतुक करण्यासाठी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे हे या कार्यक्रमासाठी स्वतः सायकलवर पोहोचले, लातूर सायकलीस्ट क्लबची लातूर शहरात स्वतंत्र सायकलिंग ट्रॅकची मागणी मान्य मान्य करून आठवड्यातून किमान एक दिवस तरी महापालिकेत सायकलवर येण्याचा मानस याठिकाणी व्यक्त केला, याबरोबर प्रत्येक लातूरकरांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी आठवड्यातील एक दिवस तरी सायकलचा वापर करावा असे आवाहन करत संतोषला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सुञसंचालन रामलिंग मदने, आभार श्रीपाद आघोर यांनी मानले. यावेळी सायकलीस्ट क्लबचे पदाधिकारी, सदस्य व सायकलप्रेमी लातूरकर यांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.