आजच्या बातम्या

 


*गंजगोलाई ते बाभळगाव शहर वाहतूक विस्तारीत बस सेवेचा 

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ*

लातूर, दि.19(जिमाका):- लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या गंजगोलाई ते छत्रपती शाहू महाराज चौक, स्वामी विवेकानंद चौक, म्हाडा वसाहत मार्गे बाभळगाव या मार्गावरील लातूर शहर वाहतूक बस सेवेचे विस्तारीकरण करण्यात आले. बाभळगाव बसस्थानक या ठिकाणी या सेवेचा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आज सकाळी करण्यात आला. 

      लातूर शहर व परिसरातील नागरीकांना माफक दरात प्रवाशी सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीने लातूर शहर महानगरपालिकेकडून शहर वाहतूक बस सेवेची सुरुवात केली गेली. या बस सेवेचे विस्तारीकरण व्हावे अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या नंतर या अनुषंगाने गंजगोलाई ते वासनगाव - गंगापूर बससेवेचा विस्तार केला गेला. 

  यावेळी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल, सरपंच प्रिया मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, पुनीत पाटील, ॲड. समद पटेल, सचिन गंगावणे यांच्यासह मनपा पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

                                                                      *********


*शेतकऱ्यांनी बीबीएफ या आधुनिक

 तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीनची पेरणी करावी*

                                            *राज्यमंत्री संजय बनसोडे*

 

*राज्यमंत्री बनसोडे यांनी स्वतः वाढवणा बु. येथील शेतकऱ्याच्या शेतात केली बीबीएफ द्वारे सोयाबीनची पेरणी*

लातूर, दि.19(जिमाका):- उदगीर तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकाचे चांगले उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धत (बीबीएफ) या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन ची पेरणी करावी, असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

          उदगीर तालुक्यातील वाढवणा बुद्रुक येथील शेतकरी गोविंद पांडुरंग तरवडे यांच्या शेतावर कृषी विभागामार्फत आयोजित बीबीएफ द्वारे सोयाबीन ची पेरणी प्रात्यक्षिक प्रसंगी राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी कल्याण पाटील, श्याम डावले, दत्ता बामने, नागेश धोंटे, पंचायत समिती सदस्य माधव कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

           राज्यमंत्री बनसोडे पुढे म्हणाले की, कृषी विभागाच्या माहितीनुसार उदगीर तालुक्यात पेरणीयोग्य पर्जन्यमान झालेले आहे. उदगीर तालुक्यातील मुख्य पीक हे सोयाबीन असून या पिकाचे चांगले उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लागेल. तरी सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी शेती पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी वापर करणे ही काळाची गरज असून कृषी विभागाने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

          वाढवणा बुद्रुक येथील शेतकरी गोविंद पांडुरंग तरवडे यांच्या शेतामध्ये रुंद वरंबा सरी पद्धत या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन पिकाचे पेरणी प्रत्यक्ष कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आले होते. हे प्रात्यक्षिक राज्यमंत्री बनसोडे यांनी स्वतः पेरणी करून केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

                                                                            ***


 

                 आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा " लाल परी "तून प्रवास..!

                                                                                 - मंत्री, ॲड. अनिल परब यांची माहिती

लातूर,दि.19(जिमाका) आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट कायम आहे. कोरोनाचे संकट पाहता मा. उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील १० मानाच्या पालख्यांसाठी एसटीची " लालपरी " धावणार आहेत. हा पालखी सोहळा नेत्रदीपक तसेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळ " लालपरी" बसेस देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष् ॲड. अनिल परब यांनी दिली. मागील वर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल ॲड. परब यांनी समाधान व्यक्त  करत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची अशीच संधी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थांनाना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी  एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील  संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आले आहेत.  असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष् ॲड. अनिल परब यांनी सांगितले. या पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील.

   वारकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतूकीकरण करण्यात येतील. तसेस प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री, ॲड. परब यांनी सांगितले. 

                                                                     ****


लातूर - जहीराबाद महामार्गाच्या दुतर्फा

त्वरीत वृक्षारोपण करून घ्यावे

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

        लातूर ,दि.19(जिमाका)  लातुर - जहिराबाद महामार्गाचे औराद शहाजनी पर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामूळे या महामार्गाच्या दुतर्फा तातडीने वृक्षारोपन करून घ्यावे, महामार्गाची देखभाल आणि वृक्षाचे संगोपन व्यवस्थित करण्यात यावे असे निर्देश सबंधित कंत्राटदार व अधिकारी यांना आढावा बैठकी दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

  लातूर - जहीराबाद या महामार्गाचे लातूर जिल्ह्यातील लातूर ते औराद शहाजनी दरम्यान ६५ किलोमीटरचे बांधकाम पूर्ण होत आलेले आहे. या संदर्भाने पालकमंत्री ना देशमुख यांनी संबंधित अधिकार्यांसंवेत शनिवारी बैठक घेऊन आढावा घेतला. या महामार्गावरील अर्धवट राहिलेले पुलांची व इतर कामे पूर्ण त्वरीत पूर्ण करावीत, कामाचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्यावी, महामार्ग बांधणी सुरू करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, त्यामुळे महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुतर्फा वृक्ष लागवड करावी असे निर्देश या बैठकीदरम्यान दिले आहेत.

          औराद ते निटूर दरम्यान वृक्षारोपण झाले असले तरी त्यातील अनेक रोपे सध्या दिसून येत नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करण्यात यावे, लातूर ते निटूर दरम्यान अद्याप वृक्षारोपण झालेले नाही.या ठिकाणी पिंपळाची रोपे लावावीत, रोडच्या डीवायडरमध्ये कन्हेरीची झाडे लावावीत. यासर्व लावलेल्या वृक्षाची निगा आणि संगोपन करावे आदी निर्देश यावेळी दिले आहेत. बैठकीस शिंदे डेव्हलपर्स प्रा लिमिटेड चे जनरल मॅनेजर रमेश गाढवे टीम लीडर दीपक गोयल मटेरियल इन्चार्ज शैलेश कुमार व अधिकारी उपस्थित होते.

                                                                  

*महानगरपालिके मार्फत 30 ते 44 व 45 वर्ष पुढील

वयोगटासाठीचे लसीकरण सात केंद्रावर होणार*

 

लातूर,दि.19(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 20 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी  पुढील प्रमाणे आहे. 30 ते 44 व  45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे  लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील,अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.

विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर,दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर), विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण),लेबर कॉलनी लातूर, यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर,प्रा.ना.आरोग्य केंद्र,राजीव नगर,विवेकानंद चौक लातूर व प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09),लातूर  येथे कोव्हीशिल्ड  लस दिली जाणार आहे.

            30 ते 44 वर्षे  वयोगट व 45 वर्षे पुढील वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लस 30 ते 44 वयोगट फक्त पहिला डोस, 45 वर्षे पुढील वयोगट- 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस, कोविशिल्ड ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.

मोबाईल पथक लसीकरण केंद्र (संबंधित परीसरातील नागरीकांसाठी) Near To Home  मनपा  शाळा,क्र.28,इंडिया लातूर, व रुकैय्या बेगम शाळा,अंजली नगर लातूर, 45 वर्ष पुढील वयोगट कोव्हिशिल्ड लस 45 वर्षेावरील  नागरीकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.

             शहरातील  इतर लसीकरण केंद्र दि. 20 जून 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                         

                                                                                       






जिल्ह्यात 30 ते 44 तसेच 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण

सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार

 

लातूर,दि.19(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 20 जून 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 30 ते 44 तसेच 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.

उपजिल्हा रुग्णालय उदगीर,पहिला व दुसरा कोविशिल्ड, व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय औसा,पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय चाकूर, पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट ग्रामीण रुग्णालय देवणी पहिला व दुसरा कोविशिल्ड  व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट,ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट व  जिल्हयातील  सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड व फक्त दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट डोस  सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार. 18 ते 44 वयोगटातील  लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीनचा केवळ दुसरा डोस लसीच्या उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे.

30 ते 44 तसेच 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध्‍ साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 20 जून 2021 रोजी कोवीशिल्ड/ कोव्हॅक्सीन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.

लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. गंगाधर परगे यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                                           *****                                                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या