*जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सर्वच रिक्त पदे तात्काळ भरावीत.*
*- लोकाधिकार संघाची मागणी*
लातुर : दि. २१ - लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पदवीधर मुख्याध्यापकासह केंद्रप्रमुखांची पदे पदोन्नतीने भरण्याची भरतीप्रक्रीया ताबडतोब पूर्ण करून सर्वच रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हाप्रमुख विरनाथ अंबुलगे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
लोकाधिकार संघाने जिल्हाभरातुन संकलित केलेल्या माहितीनुसार प्राथमिक पदवीधरांच्याही सर्व विषयांच्या अनेक रिक्त जागा पदोन्नतीने भरणे गरजेचे आहे. तसेच अनेक जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापकांची पदे रिक्तच असल्याचे दिसून आले आहे. तेंव्हा ती सर्व रिक्त मुख्याध्यापकांची पदे तात्काळ भरली जावीत.
तसेच जिल्हा परिषदेच्या कोट्यातून भरली जाणारी केंद्रप्रमुखांची आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे सुद्धा पदोन्नतीने भरण्याची प्रक्रीया लवकरात लवकर पूर्ण करावी असेही लोकाधिकार संघाने म्हटले आहे. या सर्व रिक्त जागा भरून पूर्ण झाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते मध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येईल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी यामुळे निश्चितच मदत होईल. तेंव्हा ऑगस्ट अखेरपर्यंत शिक्षण विभागातील या सर्व रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यास या वर्षीच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने ही पदोन्नती शिक्षण विभागास गौरवाची ठरेल, असे लोकाधिकार संघाचे जिल्हाप्रमुख विरनाथ अंबुलगे यांनी म्हटले आहे. तेंव्हा पदोन्नतीने भरावयाच्या सर्व जागा तात्काळ भरल्या जाव्यात अशी मागणी लोकाधिकार संघाने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.