लातूर, दि. 21 (प्रतिनिधी ): जिल्ह्यातील सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2023 करिता उद्योजकांकडून 15 मार्च 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांनी कळवले आहे.
उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी उद्यम नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच कमीतकमी मागील सलग दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकांना यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.
लातूर जिल्ह्यातील लघु उद्योजकांनी 15 मार्च 2024 पूर्वी लातूर जिल्हा उद्योग केंद्राकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खडके यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.