भादा येथे वीज पडून शेतकरी महिला मृत्युमुखी ; तीन जण गंभीर जखमी
औसा (प्रतिनिधी) औसा तालुक्यातील भादा येथील शिवारात प्रचंड विजेचा कडकडाट होऊन वीज पडल्याने एक ५५ वर्षीय शेतकरी महिला मृत्युमुखी पडली असून तिघे जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी घडली. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सध्या सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतात आठ जण सोयाबीन काढण्यासाठी गेलेले जेवण करण्यासाठी बसले असता दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास विजेचा प्रचंड कडकडाट होऊन वीज पडून शशिकला सिताराम गवळी वय ५५ वर्ष जागीच मृत्युमुखी पडल्या. तर सिताराम बाबू गवळी ,दैवशाला कटकटे, शंकर सिताराम गवळी हे जखमी झाले. जखमी पैकी दोघांना उपचारासाठी औसा येथे हलविण्यात आले आहे. प्रचंड आवाज झाल्याने इतर व्यक्ती भयभीत झाले असून अद्यापही काही जणांना थरकाप सुटला असल्याचे राजेंद्र लक्ष्मण गवळी या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मयत शशिकला सिताराम गवळी यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा आहे. सदर घटनेचा पंचनामा व मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर भादा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. वीज पडून शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याने भादा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.